उस्मानाबाद ( वाशी ) :वाशी तालुक्यातील खामकरवाडी येथील राजेंद्र इदगे व संकेत जावळे हे दोन शेतकरी रामनगर बेंगलोर येथे रेशीम विक्रीसाठी पिकपने गेले होते. रामनगर येथील रेशीम मार्केटमध्ये खामकरवाडीच्या रेशीम कोषला भाव मिळाला. त्यामध्ये ७०० रुपये प्रति किलोचा चांगला भाव मिळाला. रेशीम कोष विक्रीतून संकेत जावळे व राजेंद्र इदगे या दोन्ही शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळाले. राजेंद्र इदगे यांना एक क्विंटल रेशीम कोष चे 70 हजार व संकेत जावळे यांना 1 लाख 40 हजार रुपये मिळाले. रेशीमला चांगला भाव मिळाल्याने रेशीम विक्रीसाठी पिकपने गेलेल्या दोन्ही शेतकऱ्यांनी परतीचा प्रवास थेट विमानाने केला आहे.
रेशीम उत्पादनासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध :रेशीम कोष विक्री करून परत येताना विमान प्रवास केल्याने या दोन्ही शेतकऱ्यांचा खामकरवाडी गावकऱ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. वाशी तालुक्यातील खामकरवाडी हे रेशीम उत्पादनासाठी महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे. खामकरवाडी या छोट्याशा गावात मोठ्या प्रमाणात रेशीम शेती केली जाते. जवळपास 400 एकर पर्यंत खामकरवाडी येथे तुतीची लागवड आहे. एक ते दीड महिनाकाठी खामकर वाडी येथे रेशीम शेतीतुन 70 ते 80 लाख रुपयांची उलाढाल होते. रेशीम शेतीचे गाव म्हणून या गावाची मोठी ओळख आहे. खामकरवाडी गावात अनेक शेतकऱ्यांचे दोन किंवा त्यापेक्षा जास्त तुतीचे शेड आहेत, तर जवळपास प्रत्येक शेतकऱ्याची रेशीम शेती आहे.