उस्मानाबाद - लॉकडाऊनमुळे बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकवलेला माल विकायचा कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. त्यामुळे हाता-तोंडाशी आलेल्या पिकावर रोटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. एका शेतकऱ्याने एक एकर क्षेत्रातील कोबी पिकात चक्क रोटर फिरवला आहे.
कोरोना इफेक्ट : शेतकऱ्याने एक एकर कोबीवर फिरवला रोटर
शेतकऱ्यांनी शेतात पिकविलेला भाजीपाला, फळ, पिके घरोघरी जाऊन विकणे शक्य नाही. संचारबंदी असल्याने या पिकाला खरेदी करण्यासाठी ना व्यापारी भेटत आहेत, ना घरगुती खरेदीदार. त्यामुळे भाजीपाला, फळ हे शेतातच खराब होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे.
कोरोना इफेक्ट : शेतकऱ्याने एक एकर पत्ताकोबीवर फिरवला रोटर
जगदाळवाडी येथील शेतकरी उमाजी चव्हाण यांनी दोन महिन्यांपूर्वी शेतात एक एकर जमिनीवर पत्ता कोबीची लागवड केली होती. कोबी पिकाच्या लागवडीसाठी, मशागत करण्यासाठी, औषध फवारणी आणि मजुरीसह इतर, असा जवळपास सव्वा लाख रुपयांचा खर्च आला होता. परंतु, देशात कोरोना फोफावला असल्याने त्याला रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाय म्हणून केंद्र सरकारने देश लॉकडाऊन केला. यामुळे सर्व व्यवहार ठप्प झाले. याचा फटका सरळ सरळ या शेतकऱ्याला बसला.