उस्मानाबाद- किडनी निकामी झालेल्या रुग्णाला सरकारी योजनेतून किडनी मिळवून देतो म्हणून आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उस्मानाबाद जिल्ह्यात समोर आला आहे. विशेष म्हणजे रुग्णाच्या नात्यातीलच एका बोगस डॉक्टरकडून ही फसवणूक झाल्याचा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे. तसेच या बोगस डॉक्टराने अनेकांना गंडा घातला असल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. प्रदीप सुतार असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे. तर तेरखेडा बावी येथील नितीन सुतार या रुग्णाची फसवणूक झाली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून नितीन सुतार याच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्यावेळी रुग्ण सुतार यांच्या नात्यातील प्रदीप सुतार याने मी पेशाने डॉक्टर असल्याचे नितीन सुतार यांना सांगितले. तसेच माझ्या मंत्रालयात खूप ओळखी आहेत तुला सरकारी योजनेतून किडनी मिळवून देतो, असे आश्वासन नितीन यांना दिले. त्यानंतर या कामासाठी म्हणून नितीन सुतार आणि त्याच्या वडिलांनी डॉक्टर सुतारला 1 लाख 70 हजार रुपये दिले. मात्र पैसे देऊन तीन वर्षांचा कालावधी लोटला तरी प्रदीप सुतार हा काही त्यांचे काम करत नाही पैसेही परत देत नसल्याने सुतार पिता पूत्र हताश झाले. त्यानंतर नितीनचा शोध घेऊन त्याच्याकडे पैशाची मागणी केली असता, तो डॉक्टर नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला.
भामटा डॉक्टर अखेर गजाआड-
एक नव्हे तर 3 वर्ष प्रदीप नावाचा भामटा गेल्या 12 वर्षांपासून आपण डॉक्टर असल्याचे सांगून अनेक लोकांना फसवत असल्याचे सत्य त्यांच्या समोर आले. नितीनच्या वडिलांनी प्रदीपशी संपर्क करून पैसे मागितले असता, पैसे देत नाही तुला काय करायचे ते करून घे असा दमही त्याने नितीनच्या वडलांना दिला. शेवटचा पर्याय म्हणून नितीनच्या वडिलांनी पोलीस स्टेशन गाठले आणि नातेवाईक असलेल्या बोगस डॉक्टरच्या विरोधात आपली तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल पोलिसांनी विविध कलमांसह बोगस डॉक्टर असलेल्या प्रदीप विरोधात गुन्हा दाखल करून घेतला. गुन्हा दाखल करून घेत पोलिसांनी तात्काळ प्रदीपचा शोध घेत त्याला अटक केली आहे.
शेतकरी बापाची होतीय परवड-
दिवस रात्र शेतात राबून, घाम गाळून कमावलेल्या पैशांवर नातेवाईकांनेच डल्ला मारल्याने नितीनचे शेतकरी वडील हताश झाले आहे. नितीनला वाचवण्यासाठी चांगलीच परवड होत असून त्याचे रक्त डायलिसिस करण्यासाठी सरकारी दवाखान्यातही आठवड्याला 2 ते 3 हजार रुपये खर्च येत असून आता मुलाला वाचवावे कसे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. बोगस डॉक्टर प्रदीप सुतारला नुसती अटक होऊन चालणार नाही, तर पोलिसांनी त्याच्या कडील असणारे पैसे परत मिळवून द्यावे, अशी मागणी नितीनच्या वडिलांनी केली आहे.
अनेकांना डॉक्टर म्हणून फसवल्याचा संशय-
दरम्यान, बोगस प्रदीप सुतार गेली बारा वर्षांपासून बार्शी, कोल्हापूर, सांगली या परिसरात डॉक्टर म्हणून व्यवसाय करत होता, अशी माहिती मिळत आहे. या काळात त्याने अनेक जणांना फसवल्याचा संशय देखील व्यक्त करण्यात येत आहे. त्या दृष्टीनेच तपास सुरू असल्याचे पोलीस सांगत आहेत. तसेच प्रदीपने फसवलेले आणखी काही प्रकार समोर येतात का? याचीही माहिती पोलिसांकडून घेतली जात आहे.