उस्मानाबाद - राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक मोठा झटका बसला आहे. अंमलबजावणी संचलनालयाने ( ईडी ) मलिक यांची उस्मानाबाद येथील 148 एकर शेत जमीन जप्त केली आहे. मागील काही दिवसांपासून नवाब मलिक बेकायदेशीर मालमत्ता प्रकरणी ( Money Laundering Case ) ईडीच्या न्यायालयीन कोठडीत आहेत. अशात त्यांच्या मुंबई आणि उस्मानाबाद येथील मालमत्तेवर ईडीने टाच आणली ( ED Attached Nawab Malik Properties ) आहे.
148 एकर जमीनीवर टाच - नवाब मलिक यांच्या कुर्ल्यातील गोवावाल कंपाऊंड येथील मालमत्ता, उस्मानाबाद येथील 148 एकरांची जमीन आणि मुंबईतील 3 सदनिका आणि दोन राहत्या घरांवर ईडीने कारवाई केली आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारमधील महत्वाचे नेते म्हणून नवाब मलिक यांच्याकडे पाहिले जाते. ही कारवाई झाल्याने नवाब मालिकांना यांना हा मोठा दणका मानला जातो आहे. उस्मानाबाद तालुक्यातील आळणी व जवळा (खुर्द ) शिवारातील 148 एकर जमीन नवाब मलिक यांच्या पत्नी, मुलगा व मुलीच्या नावावर आहे. ही जमीन साधारणत: 9-10 वर्षांपूर्वी खरेदी केलेली आहे. आळणी फाटा ते ढोकी मार्गांवर राष्ट्रीय महामार्गपासून एक किमी अंतरावर ही जमीन असून, हे ठिकाण हैदराबाद, औरंगाबाद व जेएनपिटी बंदराला पोहचण्यासाठी सोईस्कर असल्यामुळे मलिक कुटुंबीयांनी त्यांच्या व्यवसायासाठी खरेदी केली होती.