उस्मानाबाद -शहरात मागील दोन वर्षापासून गल्लोगल्ली रस्त्यावर वाढदिवस करण्याचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. यामुळे कंटाळलेल्या लोकांनी शम्स चौकात चक्क गाढवाचाच वाढदिवस साजरा केला. या भागातील नागरिकांनी अशा प्रकारे केक कापून रस्त्यावर वाढदिवस साजरा करणाऱ्यांना अप्रत्यक्ष खोचक टोला दिला आहे.
शहरात सध्या चौकाचौकात वाढदिवस करणार्या तरुणांमुळे नागरिकांची डोकेदुखी वाढली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास होणाऱ्या या वाढदिवसांमुळे नागरिक वैतागले आहेत. मध्यरात्रीदरम्यान फटाके आतषबाजी आणि धिंगाण्याचे प्रमाण वाढले आहे. असाच प्रकार गेल्या काही महिन्यापासून शम्स या चौकात होत आहे. या चौकात ज्येष्ठ नागरिकांना बसण्यासाठी खास कट्टा केलेला आहे. परंतु या कट्ट्यावर सातत्याने तरुणांचे वाढदिवस साजरे केले जात असल्याने या भागातील ज्येष्ठ नागरिकही वैतागले होते. त्यामुळे वैतागलेल्या नागरिकांनी केक कापून गाढवाचा वाढदिवस साजरा करत मध्यरात्री धिंगाणा घालणाऱ्यांना अप्रत्यक्षपणे खोचक टोला दिला आहे.