उस्मानाबाद - शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पदव्युत्तर डॉक्टर विद्यार्थ्यांनी बेमुदत संप पुकारला आहे. सोबतच मागण्या मान्य होईपर्यंत संप मागे न घेण्याचा निर्धार देखील या विद्यार्थ्यांनी केला आहे. विविध आयुर्वेद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे कोविड रुग्णांच्या उपचारावर परिणाम होण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारात 'समान काम समान वेतन' अशी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन सुरू केले आहे.
मागील ६ महिन्यांपासून सदर विद्यार्थी डॉक्टरांच्या खांद्याला खांदा लावून कोविड रुग्णांवर उपचार करीत आहेत. मात्र, तरीही शासनाकडून अन्याय केला जात असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. ऑगस्ट महिन्यात शासनाने पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात दरमहा १० हजार रुपयांनी वाढ केली. मात्र, यातून आयुर्वेद विद्यार्थ्यांना वाढीव वेतनातून वगळण्यात आले. हा अन्याय असल्याचे म्हणत या विद्यार्थ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.