उस्मानाबाद - तुळजापूर येथील तुळजाभवानी मातेच्या सिंहासन पूजेचे शुल्क वाढविण्याचा निर्णय मंदिर संस्थांनाने घेतला आहे. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांच्या खिशाला आणखी कात्री लागणार आहे.
तुळजापूरच्या तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी भाविकांची रांग लागलेली असते. मात्र, आता मातेच्या सिंहासन पूजेसाठी भाविकांना जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. मंदिर संस्थानच्या रविवारी झालेल्या बैठकीत हा दरवाढीचा निर्णय घेण्यात आला. यामध्ये, तुळजाभवानीच्या श्रीखंडाच्या सिंहासन पूजेसाठी १ हजार रुपयांवरून १५०० हजार रुपये करण्यात आले आहे. तर, दह्याच्या सिंहासन पूजेसाठी ९०० रुपयांवरून १२०० रुपये शुल्क आकारण्यात येणार आहेत. यापूर्वी जुलै २०१७ मध्ये मंदिर संस्थानने पूजेची शुल्कवाढ केली होती. मंदिर संस्थानच्या विश्वस्तांनी मंदिरच्या प्रशासकीय इमारतीत जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष दीपा मुधोळ यांच्या अध्यक्षतेखाली घेतलेल्या बैठकीत ही शुल्कवाढ केली.