उस्मानाबाद- उन्हाळा म्हटलं की मराठवाड्यातील नागरिकांसाठी नकोसा वाटणारा ऋतू झाला आहे. वर्षानुवर्ष कमी होत जाणारा पाऊस दुष्काळ आणि त्यातून उद्भवणारी पाणीटंचाई शहरासह ग्रामीण भागात पाण्यासाठी भटकंती उन्हाळ्यात पाहायला मिळते. त्याचप्रमाणे गल्लोगल्ली वाटसरुंची तहान भागवणारे राजकीय नेत्यांच्या नावाने असलेल्या पाणपोईचे पेवही फुटलेले पाहायला मिळतात. मात्र, यंदा त्या पाणपोईंचा दुष्काळ दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता होय.
उन्हाळा आला की गल्लोगल्ली पाणपोई पाहायला मिळते अगदी हाकेच्या अंतरावर अशा बहुसंख्य पाणपोई तहानलेल्या वाटसरुंची तहान भागवतात. मात्र यावर्षी शहरातच काय तर ग्रामीण भागातही अशी पाणपोई पाहायला मिळत नाही. मात्र आचारसंहितेच्या कचाट्यात सापडेली पाणपोई आता वाटसंरुची तहान भागवू शकत नाही.
पाणपोईचा आणि आचारसंहितेचा संबंध काय?
पाणपोई सुरू करण्यासाठी आघाडीवर असतात ते राजकीय कार्यकर्ते. मात्र यावर्षी या कार्यकर्त्यांना पाणपोई सुरू करता आलेली नाही. उन्हाळा सुरू होताच लोकसभेचे वारे वाहू लागले होते आणि यातच आदर्श आचारसंहिता लागू झाली. त्यामुळे या कार्यकर्त्यांचे पाणपोई उभा करण्याचे या वर्षीचे स्वप्न भंगले आहे. कारण पाणपोईच्या नावाने राजकीय प्रचार आणि प्रसिद्धी केली जाते.
दादा-मालक नावांच्या 'पाणपोईंचा' दुष्काळ या पाणपोई दादा, ताई, थोरले मालक, धाकले मालक, तात्या अशा नावानेच सुरू केल्या जातात. नावाबरोबरच सोबत विविध पक्षांचे झेंडे त्यांची चिन्हे असतात, त्यामुळे आचारसंहिता सुरू असताना झेंडे पक्षाचे चिन्ह लावून पाणपोई कशी सुरू करायची असा प्रश्न उपस्थित होतो. कारण तो आचार संहितेचा भंग मानला जातो. उन्हाळात अशा पक्षसंघटनेच्या नावे पाणपोई सुरू करणे म्हणजे राजकीय क्षेत्रातील वरिष्ठांची मर्जी राखणे, असा समज आहे. राजकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांची संख्याही काही कमी नाही. त्यामुळे पाणपोई सुरू करून भविष्यातील स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न हे तरुण करत असतात. मात्र यंदा त्यांच्या राजकीय कार्यक्रमावर आचारसंहितेच पाणी फिरले आहे.
या आचारसंहितेचा फटका मात्र सामान्यांना बसत आहे. कारण दरवर्षी पाणपोई सुरू करणाऱ्या तरुणांची संख्याही भरपूर असते. मात्र यावर्षी या तरुणांनी पाणपोई सुरू केली नाही. जर का पाणपोई सुरू केलेली असती तर आचारसंहितेमुळे स्वतःचा आणि पक्षाचे मार्केटिंग करता आले नसते. त्यामुळे त्यांनी पाण पोईकडे कानाडोळा केला. मात्र, पाणपोईच्या या दुष्काळामुळे तहानलेल्या वाटसरूंना मात्र पिण्याच्या पाण्यासाठी हॉटेलची वाट धरावी लागत आहे.