उस्मानाबाद - जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर बुधवारी चाकू हल्ला झाला होता. शिवसेना विधानसभेचे उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचाराला गेले असता खासदार राजेनिंबाळकर यांच्यावर हा चाकूहल्ला करण्यात आला. यावेळी त्यांच्या हाताला किरकोळ दुखापत झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने आरोपीला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
जिल्ह्याचे खासदार राजेनिंबाळकर यांच्यावर झालेल्या चाकू हल्ल्याप्रकरणी आरोपी अजिंक्य टेकाळे यास काल शिराढोण पोलिसांनी अटक केली होती. याप्रकरणी त्याला आज(गुरुवारी) कळंब येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या समोर पोलीस बंदोबस्तात हजर केले होते. यावेळी संबंधित तपासणी अधिकारी यांनी गुन्ह्याबदल पूर्ण माहिती दिली. तसेच गुन्ह्याबाबत चौकशी करून आरोपीस जास्तीत-जास्त दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली.