उस्मानाबाद - तुळजाभवानी मंदिरात आजवर अनेक वेळा भ्रष्टाचार झाल्याचे समोर आले आहे. मागील काही वर्षांत मंदिरातील दागिने आणि नाणी गायब झाल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत. याप्रकरणी त्यांनी परिपत्रक काढले आहे. या प्रकरणी तुळजाभवानीचे पुजारी किशोर गांगणे यांनी 9 मे 2019 रोजी तक्रार दिली होती.
तुळजाभवानीचे मौल्यवान दागिने गायब केल्या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश, जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई - osmanabad collector news
मागील काही वर्षांत तुळजा भवानी मंदिरातील दागिने आणि नाणी गायब झाली होती. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याचे आदेश जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहेत.
तुळजाभवानीचे काही मौल्यवान दागिने आणि नाणी मंदिर प्रशासनाच्या ताब्यातून गायब झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ मुंढे यांनी संबंधित प्रकरणात चौकशी समिती नेमली. अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समितीने चौकशी करून अहवाल सादर केला. यामध्ये 1980 पर्यंत पुरातन आणि मौल्यवान दागिने मंदिर संस्थांच्या ताब्यात असल्याचे स्पष्ट झाले. मात्र त्यानंतर 2005 आणि 2018 दरम्यान या दागिन्याचा पंचनामा करण्यात आला. यामध्ये सुमारे 71 नाणी आणि काही पुरातन मौल्यवान दागिने गायब झाल्याचे आढळले. त्यामुळे तत्कालीन मंदिर प्रशासन अधिकारी दिलीप नाईकवाडी यास जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दिवेगावकर यांनी मंदिर प्रशासनाच्या तहसीलदारांना दिले आहेत.
मौल्यवान 71 नाणी गायब
तुळजाभवानी मातेच्या चरणी अनेक राजे राजवाड्यांनी मौल्यवान दागिने अर्पण केले आहेत. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, निजाम, औरंगजेब, अशा मोठ्या घराण्यांनी देवीला दागिने अर्पण केल्याची नोंद मंदिर प्रशासनाकडे आहे. असे असंख्य मौल्यवान दागिन्यांचे मूल्य कोटींच्या घरात आहे. हे अमूल्य दागिने गायब झाल्याचे आता स्पष्ट झाले आहे.