उस्मानाबाद- देवळालीतील अक्षय देवकर या विद्यार्थ्याने अकरावीमध्ये चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळेल की, नाही या चिंतेतून चार दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. या देवकर कुटुंबास आज छत्रपती संभाजी राजे भोसले यांनी भेट घेत आत्महत्या केलेल्या मुलाच्या आई-वडिलांचे सांत्वन करीत त्यांना आधार दिला. आरक्षण गेले खड्ड्यात असे ट्विट छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी केले होते.
यावेळी बोलताना संभाजी महाराज म्हणाले की, मी मनापासून थक्क झालो आहे, बोलण्यासारखे शब्दच उरले नाही. गरिबीतून अक्षयच्या आईने त्याला शिकवले तो नेहमी सांगायचा मराठा समाजात जन्म झाला ते चुकले परंतु, हे बरोबर नाही. राजर्षी शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले, मराठा समाजाचाही या आरक्षणामध्ये समावेश होता. आज सरकारने जाहीर केलेले मराठा आरक्षण न्यायालयात प्रलंबित आहे. देवकर कुटुंबाच्या भावना तीव्र दुःखी आहेत, मी आरक्षण गेलं खड्ड्यात, असं बोललो मात्र, मी आरक्षणाच्या विरोधात नाही. कारण माझ्या आजोबांनी आरक्षण दिले आहे. मात्र, शाहू महाराजांना अपेक्षित असलेल आरक्षण आपण देतोय का? हा प्रश्न आहे. पूर्ण बहुजन समाजाच्या लोकांना आरक्षण द्यावे आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात कोणीही जाऊ नये अशी विनंती मी इतर समाजाच्या लोकांना करत आहे.