उस्मानाबाद -जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. काल भूम तालुक्यातील जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे ओढे आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. वरडेवाडी येथील ओढ्याला आलेल्या पुरातून दुचाकी चालवण्याचे धाडस करणे, एका व्यक्तीच्या अंगलट आले. मात्र, गावातील तरुणांनी प्रसंगावधान राखत त्याचा जीव वाचवला. नानासाहेब पाटोळे असे या व्यक्तीचे नाव आहे.
दुचाकीसह वाहून गेलेल्या व्यक्तीचा तरुणांनी वाचवला जीव
पावसाळ्यात ओढ्या-नाल्यांना पूर येतात. अनेक जण या पुरात नको ते धाडस करण्याचा प्रयत्न करतात आणि आपला जीव धोक्यात घालतात. भूम तालुक्यातील वरडेवाडी गावतही एका व्यक्तीने असेच धाडस केले मात्र, दैव बलवत्तर म्हणून त्या व्यक्तीचा जीव वाचला.
ओढा
पुलावरील पाण्यातून पाटोळे दुचाकीवरून जात होते. पण तेवढ्यात पाण्याचा प्रवाह वाढल्याने गाडीचे संतुलन बिघडले व ते पाण्यात वाहून गेले. मात्र, गावातील तरुणांनी पळत जाऊन दीडशे मीटर अंतरावर ओढ्यात उड्या घेत नानासाहेब पाटोळेंना त्यांच्या दुचाकीसह बाहेर काढले. या घटनेनंतर, कोणीही पाण्यात जाण्याचे धाडस करू नये असे, असे आवाहन पाटोळे यांनी केले आहे.