उस्मानाबाद- महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जिल्हा भाजपने 25 फेब्रुवारीला तहसीलसमोर आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलना बाबतची माहिती तुळजापूर विधानसभा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राणाजगजितसिंह हे पवारांचे पाहुणे आहेत.
अजित पवारांचे सोयरेच म्हणतात.. महाविकास आघाडी सरकार विश्वासघातकी - उस्मानाबाद
शेतकऱ्यांची कर्ज माफी असो की महिलांसंदर्भात कडक शासन याबाबत महाविकास आघाडीचे सरकार विश्वासघातकी ठरले असल्याची टीका तुळजापूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी केली. सरकारच्या निषेधार्थ उस्मानाबादेतील जिल्हाधिकारी कार्यालयाबरोबर जिल्ह्यातील प्रत्येक तहसीलदार कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करणार असल्याचेही ते म्हणाले.
महाविकास आघाडीचे सरकार येऊन नव्वद ते शंभर दिवस पूर्ण होत आले आहेत. मात्र, या दिवसात या सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. किमान समान कार्यक्रमात ठरल्याप्रमाणे शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी दिली गेली नाही. दोन लाखांच्यावर कर्ज असणाऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही. राज्यपालांनी जाहीर केलेली आठ हजारांची मदत अनेक शेतकऱ्यांना मिळालेली नाही. तसेच महिला अत्याचाराचे वाढते प्रमाण या विरोधात मंगळवारी (दि. 25 फेब्रुवारी) जिल्ह्यातील प्रत्येक तहसील कार्यालयासमोर हे आंदोलन होणार आहे. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष नितीन काळे जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता कांबळे नेताजी पाटील आदी उपस्थित होते.
हेही वाचा -उस्मानाबादेत रोपांपासून साकारली 'शिवप्रतिमा'