उस्मानाबाद - मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी तुळजापूर दौऱ्यात तुळजाभवानीचे दर्शन घेतले याला भाजपने आक्षेप घेतला आहे. ऑनलाइन दर्शन घ्यायला हवे होते याची आठवण करून दिली आहे. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आले होते. त्यांनी तुळजापूर तालुक्यातील काटगाव, कात्री, अपसिंगा या गावाची पाहणी केली आणि त्यानंतर तुळजापूर शहरात असलेल्या शासकीय विश्रामगृहात अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन त्यानंतर पत्रकार परिषद घेतली. त्यांनतर त्यांनी ठाकरे घराण्याची कुलस्वामीनी असलेल्या तुळजाभवानीची महाद्वार येथे जाऊन बाहेरील फोटोची पूजा करत दर्शन घेतले. हाच मुद्दा पकडत भाजपने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या तुळजाभवानी दर्शनाला भाजपाचा आक्षेप - bjp latest news
ठाकरे घराण्याची कुलस्वामीनी असलेल्या तुळजाभवानीची महाद्वार येथे जाऊन बाहेरील फोटोची पूजा करत दर्शन घेतले. हाच मुद्दा पकडत भाजपने मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे.
नवरात्र सुरू होण्यापूर्वी प्रशासनाने देवीच्या भक्तांना तुळजापुरात न येण्याचे आवाहन केले होते. तसेच तुळजापूर येथे प्रवेश बंदीदेखील केली गेली आहे. त्यामुळे यावर्षी अनेक भक्त हे देवीच्या दर्शनापासून वंचित आहेत, असे असतानादेखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना असणाऱ्या विशेष अधिकाराचा वापर करत महाद्वारातून दर्शन घेतले आहे. यालाच भाजपने विरोध केला असून भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांनी देवीचे मंदिर भक्तांच्या दर्शनासाठी खुले करावे, अशी मागणी केली आहे.