उस्मानाबाद - तालुक्यातील झरेगाव हद्दीतील भोगावती नदीतील कथित वाळू चोरीचे प्रकरण 'ईटीव्ही भारत'ने लावून धरल्यानंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत तहसीलदार, नायब तहसीलदार, मंडलाधिकारी आणि तलाठी यांना चौकशीचे आदेश दिले होते. याप्रकरणी मंडलाधिकारी व तलाठी यांच्या अहवालामध्ये आणि नायब तहसीलदार यांच्या अहवालामध्ये तफावत आढळून आली आहे. त्यामुळे या प्रकरणात काहीतरी गौडबंगाल असल्याचे स्पष्ट होत आहे.
ईटीव्ही भारत इंम्पॅक्ट: भोगावती नदी वाळू प्रकरणी चौकशी पूर्ण; मात्र अहवालात गौडबंगाल असल्याचे स्पष्ट हेही वाचा - ग्रामसेवकाने तब्बल दीड कोटींची ढापली वाळू; भोगावती नदी परिसरातील प्रकार
चिलवडी या गावच्या तलाठी अश्विनी निंबाळकर आणि मंडल अधिकारी टोणे यांनी 'ईटीव्ही भारत'ने बातमी प्रकाशित केल्यानंतर रविवारी वाळू साठ्याला भेट दिली होती. यावेळी त्यांनी पंचनामा करुन 3 फेब्रुवारीला तहसिल कार्यालयाला अहवाल सादर केला. त्यामध्ये अंदाजीत 25 ते 27 ब्रास वाळू असल्याचे नमुद केले आहे. ग्रामसेवकाच्या वडिलांच्या मालकीच्या तीन विहिरीसाठी व घर बांधण्यासाठी वाळूचा साठा केला असल्याचे पंचनाम्यात नमुद करण्यात आले आहे.
तलाठी व मंडलाधिकाऱ्याच्या अहवालानंतर पुन्हा निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधीत नायब तहसीलदारांसह तहसीलदारांना पाहणी आणि पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नायब तहसीलदार राजाराम केलुरकर यांनी वाळू साठ्याला भेट दिली. मात्र, ज्या ठिकाणावरून वाळू खणून आणली होती त्या (गट क्रमांक-22) ठिकाणाला भेट दिली नसल्याचे सांगण्यात येत आहे. नायब तहसीलदार यांनी दिलेल्या अहवालात रंगनाथ एडके यांच्या गटातील (गट क्रमांक 17) वाळू साठ्याला भेट दिली. त्याठिकाणी 80 ते 90 ब्रास वाळू असल्याचा अहवाल दिला आहे. मात्र, नियमानुसार परवानगीशिवाय शेतामध्ये वाळू साठवून ठेवत येत नाही. तलाठी आणि मंडलाधिकारी यांनी दिलेल्या अहवालात आणि नायब तहसीलदार यांच्या अवालात वाळूच्या क्षमतेविषयी मोठी तफावत असल्याचे दिसून येत आहे. तहसीलदार यांना तफावतीबाबत विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
ग्रामसेवकाचे वडिल रंगनाथ एडके यांना याबद्दल विचारले असता ते म्हणाले, "आम्ही नदी पात्रातील वाळू उपसली नसून, दुसऱ्या ठिकाणची वाळू आहे, जिथे आम्ही गाळ उचलला होता त्या ठिकाणची वाळू आहे व तीचा वापर आम्ही घर व विहिरीसाठी वापर करणार आहोत."
हेही वाचा - 'ईटीव्ही भारत' ईम्पॅक्ट: प्रशासनाने घेतली दखल मात्र ग्रामसेवकाला वाचवण्याचे अधिकाऱ्याकडून प्रयत्न