उस्मानाबाद :कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मंदिरात वेस्टर्न कपड्यांवर बंदी घालण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. तोडके कपडे घालून देवीचे देवीच्या दर्शन करण्यास मनाई करण्यात आली आहे. भारतीय संस्कृती व सभ्यतेचे भान राखण्याचे आवाहनही संस्थानने केले आहे. तसा आशयाचा फलकदेखील तुळजाभवनी मंदिरात फलक लावण्यात आला आहे. असभ्य वस्त्र परिधान करुन येणाऱ्यांना मंदिरात प्रवेश नाही, असे फलक आजपासून मंदिरात लावण्यात आले आहे. ऑक्टोबर 2018मध्ये नवरात्री दरम्यान कोल्हापूर महालक्ष्मी मंदिरबाबत असाच निर्णय घेतला होता. तर शिर्डीमध्येही अशाप्रकारचे बोर्ड लावण्यात आले होते. पण लोकांच्या विरोधानंतर हे फलक काढण्यात आले होते. या घटना ताज्या असताना आता तुळजाभवानी मंदिर प्रशासनाने असा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या वादाला सुरूवात होण्याची शक्यता आहे.
काय आहे नियमावली : तुळजाभवानी मंदिर हे राज्यातील एक शक्तीपीठ मंदिर आहे. साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे हे मंदिर बालाघाटच्या एक कड्यावर वसले आहे. हे मंदिर राष्ट्रकुट म्हणजे यादवकालीन असल्याचे सांगितले जाते. या तुळजाभवानी मंदिरामध्ये प्रवेशासाठी मंदिर संस्थांच्या वतीने एक नियमावली जारी करण्यात आली आहे. बरमोडा, हाफ पॅन्ट, उत्तेजक कपडे तसेच अंग प्रदर्शन करणारे कपडे घातलेल्या भाविकांना मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. महिलांना वन पीस, शॉर्ट स्कर्ट, शॉर्ट पॅन्ट परिधान करुन मंदिरात प्रवेश करता येणार नाही. पुरुषांना देखील शॉर्ट पॅन्ट घालता येणार नाही.