उस्मानाबाद : सीना कोळेगाव धरणात परंडा व करमाळा तालुक्यातील स्थानिक मच्छिमारांना मच्छिमारी करण्यासाठी पास मिळावा या मागणीसाठी मच्छीमारांचे आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी दुपारपासून उस्मानाबाद शहरातील सहाय्यक आयुक्त मत्स्य कार्यालय येथे मच्छीमारांनी ठिय्या मांडला आहे. परवाना मिळाल्याशिवाय इथून उठणार नसल्याचा पवित्रा मच्छीमारांनी घेतला आहे. या आंदोलनात तरुण, महिला आणि वृद्धांसह शेकडो आंदोलक सहभागी झाले आहेत.
सायंकाळपर्यंत दखल न घेतल्याने आंदोलक संतप्त
सायंकाळपर्यंत कोणीही आंदोलनाची दखल न घेतल्याने आंदोलकांनी आक्रमक रूप धारण केले. आंदोलक आंदोलनाच्या सुरुवातीपासून घोषणा देऊन अर्धनग्न आंदोलनाकडे वळले होते. आंदोलनाच्या सुरुवातीला आनंद नगर पोलिसांनी आंदोलक आणि प्रशासनात चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न केला. सहायक आयुक्त न्यायालयीन कामासाठी औरंगाबाद येथे गेले असल्याने निर्णय घेण्यास सक्षम अधिकारी नव्हते. त्यामुळे आंदोलक आंदोलनाच्या भूमिकेवर ठाम असल्याने पोलिसांनी केलेली चर्चा तूर्तास निष्फळ ठरली आहे.
कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर आंदोलकांचा मुक्काम
आंदोलनस्थळी कोणतेही अधिकारी न फिरकल्याने आंदोलकानी अधिक तीव्र पवित्रा घेतला. आंदोलकांनी संबंधित कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर आपला मुक्काम ठोकला. रात्रीचे 10 वाजले तरी आंदोलक कार्यालयाच्या चौथ्या मजल्यावर बसून होते. या ठिकाणी कोणतीही जीवितहानी होऊ नये यासाठी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला.