उस्मानाबाद -शिक्षकांना मोबाईलवर 'लूडो गेम' खेळणे चांगलेच भोवले आहे. शिक्षणाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर शिक्षण विभागाने शाळेतील ११ शिक्षकांवर कारवाई करत त्यांची कायमस्वरुपी वेतनवाढ बंद केली आहे. हा प्रकार नळदुर्ग येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांबाबत घडला आहे. त्यामुळे आता शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
हेही वाचा - शालेय अभ्यासक्रमात हिंदी किंवा संस्कृत सक्तीचे करा; झारखंडच्या शिक्षणमंत्र्यांची मागणी
नळदुर्ग येथील जिल्हा परिषद प्रशालेतील काही शिक्षक हे विद्यार्थ्यांना ज्ञानदान करण्यापेक्षा शाळेत आल्यानंतर सतत मोबाईलवर लुडो सारखे जुगारी खेळ खेळत असल्याचे स्थानिक नागरिकांनी आरोप केला आहे. तसेच हे शिक्षक वर्ग चालू असताना वर्गाबाहेर येऊन सतत फोनवर बोलत होते, विद्यार्थ्यांना असभ्य भाषेत बोलणे, अशा अनेक तक्रारी नागरिकांनी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी, राज्याचे शिक्षणमंत्री, विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे केली होती.
त्यावरुन शाळेचे मुख्याध्यापक बी. एम. जाधव यांच्यासह इतर दहा शिक्षकांवर शिक्षण विभागाने कारवाई केली आहे. जिल्हा परिषद प्रशालेतील एकूण अकरा शिक्षकांवर ही कारवाई केली असून या शिक्षकांची कायमस्वरुपी वेतनवाढ बंद केली आहे. पालकांच्या व इतर लोकांच्या तक्रारीवरुन शिक्षणविभागाने या शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावून त्यांना त्यांचा अहवाल मागितला होता. संबंधीत शिक्षकांकडून गेलेला अहवाल हा समाधान कारक नसल्याने १७ सप्टेंबर रोजी कायमस्वरुपी वेतनवाढ बंद केल्याची नोटीस बजावण्यात आली त्यामुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे.
या शिक्षकांवर केली आहे कारवाई -
मुख्याध्यापक बी एम जाधव, जाधवर एस एल,व्ही टी भालके, बी व्ही गायकवाड, के ए शेख, बी एच सनगुंदी, ए ए लोहार, एस जी इनामदार, श्रीमती हन्नुरे, श्रीमती ए झेड शेख, श्रीमती व्ही डी पाटील आदी शिक्षकांवर कायमस्वरुपी वेतनवाढ बंद करण्याची कारवाई करण्यात आली आहे.
हेही वाचा - कोपरगावमध्ये भाजपच्या स्नेहलता कोल्हेंकडून आचारसंहितेचा भंग