उस्मानाबाद -जिल्ह्यातील चिखली येथे सुट्टीवर आलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा कर्मचारी रेड झोन असलेल्या सोलापुरातून उस्मानाबादेत आपल्या गावाला आला होता. नुकतीच सुट्टी संपवून सोलापूरला परतला असून त्यांची चाचणी घेतली असता ती पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे उस्मानाबादेत खळबळ उडाली आहे.
सुट्टी संपवून कर्तव्यावर गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण, कोणाच्या परवानगीने उस्मानाबादेत प्रवेश? - उस्मानाबाद लेटेस्ट न्युज
रेडझोन असलेल्या सोलापुरातून उस्मानाबादेत सुट्टीवर आलेल्या आणि परत सोलापूरला कर्तव्यावर गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे उस्मानाबादेतील चिखली गाव सील करण्यात आले आहे.
संबंधित पोलीस कर्मचारी चिखली गावचा रहिवासी असून सध्या सोलापूर येथे कार्यरत आहे. तो सुट्टीनिमित्त चिखली येथे आला होता. सुट्टी संपवून सोलापूरला परतल्यानंतर त्याची कोरोना चाचणी घेण्यात आली. त्यानंतर त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. याबाबत जिल्हा शल्य चिकित्सक राजाभाऊ गलांडे यांच्याशी संपर्क साधला असता चिखली गाव सील केले असल्याचे सांगितले. तसेच संबंधित कर्मचाऱ्याच्या संपर्कातील लोकांना उस्मानाबादेत तपासणीसाठी आणण्यात आल्याचे ते म्हणाले.
जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे आणि पोलीस अधिक्षक राज तिलक यांच्याशी आम्ही संपर्क साधून हा पोलीस कर्मचारी रेडझोनमधून उस्मानाबादेत कधी आला? तसेच उस्मानाबादला येण्यासाठी परवानगी मागितली होती का? हे विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र, संपर्क होऊ शकला नाही.