उस्मानाबाद- ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. संत गोरोबाकाकांच्या भक्तीच्या मळ्यात साहित्याचा सुगंध पसरणार असल्यामुळे हे साहित्य संमेलन उस्मानाबादकरांसाठी आनंदाची पर्वणी निर्माण करणारे आहे. याच आनंदात विद्यार्थीदेखील सहभागी झाले आहेत.
पहिल्यांदाच हे संमेलन उस्मानाबादमध्ये होत असल्याने याचाच अभिमान बाळगून हे संमेलन मोठ्या उंचीवर पोहचविण्यासाठी चिमुकल्यांनी कंबर कसली आहे. कळंब तालुक्यातील श्री संत बोधले महाराज प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील इयत्ता सहावी व सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आगळीवेगळी संकल्पना राबवली.
विद्यार्थ्यांनी नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी बनविण्यात येणाऱ्या शुभेच्छा पत्रावर साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ज्येष्ठ साहित्यिकांच्या कवितेच्या ओळी हस्तलिखित केल्या. ही शुभेच्छापत्रे मोठ्या कौतुकाचा विषय ठरले आहेत. एकीकडे बाजारात इंग्रजी, हिंदी व मराठी शुभेच्छा पत्रांचा वर्षाव होत असतानादेखील साहित्य संमेलनाच्या निमित्ताने ही आगळीवेगळी पत्रके विद्यार्थ्यांनी बनविलेली आहेत. या उपक्रमसाठी विद्यार्थ्यांना शाळेतील शिक्षक रमेश अंबिरकर यांनी मार्गदर्शन केले आहे.