उस्मानाबाद - 93 व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला शुक्रवारी सुरूवात झाली. संमेलनाच्या दुसरी दिवशी 2 कक्षांमध्ये कवी संमेलन सुरू होते. तर औरंगाबाद येथील संजय झटू हे स्वतःच्या गळ्यातच कविता अडकवून सर्वांना दाखवत होते. ही कविता सध्याच्या राजकीय स्थितीवर भाष्य करणारी आहे. त्याचे हेडिंगच 'गर्व से कहो... हम हलकट हैं...' असे होते. यानंतर वाचकांची आणि तरुणांचीही त्यांच्याभोवती गर्दी होती. त्यांच्यासोबत अनेकांनी सेल्फी काढले. तसेच, कविता वाचन केले.
साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध कार्यक्रमांनी सर्व कक्ष सजले होते. शिवाय शहरासह ग्रामीण भागातील विद्यार्थीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. मात्र, या सर्व परिस्थितीत संजय झटू हे लक्ष वेधून घेत होते. बदलत्या परिस्थितीनुसार राजकीय नेत्यांनी गेल्या 3 महिन्यात आपली भूमिका बदलली आहे. एकीकडे एकमेकांच्या विरोधात असलेले राजकीय नेते आता गळ्यात गळे घालून महाराष्ट्राभर फिरत आहेत. मात्र, दुसरीकडे स्थानिक पातळीवर कार्यकर्ते गटातटाचे राजकारण करून एकमेकांमध्ये भांडत आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांची भूमिका आणि त्यामुळे कार्यकर्त्यांचे होत असलेले नुकसान झटू यांनी मांडले आहे.