उस्मानाबाद -येत्या १० जानेवारीला सुरू होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची तयारी जोरदार सुरू आहे. संत गोरोबाकाका साहित्यनगरी येथे हे संमेलन होणार आहे. यानिमित्त आज (३ जानेवारी) ला संमेलनाच्या जनजागृतीसाठी साहित्याची ज्योत निघणार असून अचलबेट येथून या ज्योतीची सुरुवात होणार आहे. त्याचा समारोप ४ जानेवारीला उस्मानाबाद येथे होणार असल्याचे स्वागताध्यक्ष नितीन तावडे यांनी सांगितले.
साहित्य संमेलन अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. संमेलनाची सुरुवात ग्रंथदिंडीने होणार असून ग्रंथप्रदर्शन, तुळजापूर, पारंपारिक गोंधळ, कवी संमेलन, सांस्कृतीक कार्यक्रम, कथा-कथन, कवी कट्टी, बालकुमार मेळावा, असे विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. संमेलनासाठी ३ सभा मंडपाची उभारणी सुरू असून या सभामंडपाना शाहीर अमर शेख, दत्तो आप्पा तुळजापूरकर, सेतू माधव पगडी यांची नावे देण्यात आली आहेत.