उस्मानाबाद -जिल्ह्यातील परंडा तालुक्यात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. अवघ्या 10 वर्षाच्या अल्पवयीन चिमुकलीवर 23 वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याचे समोर आले आहे. तिच्यावर उस्मानाबाद जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परंडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
परंडा तालुक्यातील एका गावातील पीडित मुलगी गुरुवारी आपल्या घरून दळण दळून आणण्यासाठी बाहेर पडली होती. त्या दरम्यान गावातील 23 वर्षीय नराधम आरोपी तिच्यावर पाळत ठेऊन होता. आजूबाजूला कोणी नसल्याचा फायदा घेत आरोपीने तिचे तोंड दाबून तिला बाजूच्या एका शेतात नेले. आरोपीने प्रतिकार करणाऱ्या चिमुकलीला मारहाणदेखील केली. तिच्यावर लैंगिक अत्याचार केले.
हेही वाचा-Physical abuse : चुलत बहिणीवर केला अत्याचार, भिवंडी परिसरातून एकास अटक
काही तासांतच पोलिसांनी आवळल्या नराधमाच्या मुसक्या
नराधम आरोपी पीडितेला तिथेच सोडून पळून गेला. दरम्यान पीडित मुलीने रडत आपल्या घरी जाऊन झालेली हकीगत आई-वडिलांना सांगितली. तिच्या आई-वडिलांनी तात्काळ परंडा पोलीस स्टेशन गाठले. त्यांनी आपबीती कथन केली. पोलिसांनी तक्रारीनुसार रात्री उशिरा गुन्हा दाखल करून घेतला. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी यंत्रणा फिरवित आरोपीचा शोध घेत त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.
हेही वाचा-डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरण; २२ आरोपींच्या कोठडीत 5 दिवसांची वाढ
प्रकृती खालावल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल
क्रूर पद्धतीने मारहाण आणि लैंगिक अत्याचार केल्याने पीडिता जखमी झाली होती. दरम्यान घरी आल्यानंतर रक्तस्राव वाढत असल्याने तिला परंडा तालुक्यातील एका रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, तिची प्रकृती जास्तच खालावल्याने उस्मानाबाद जिल्हा रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठवण्यात आले. सध्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. पोलीसदेखील तिचा जवाब घेण्यासाठी रुग्णालयात जाणार आहेत.
हेही वाचा-परिचारकाने लग्नाचे अमिष दाखवून डॉक्टर मुलीवर केला वारंवार बलात्कार
उस्मानाबाद जिल्ह्यात वाढत्या बलात्काराच्या घटना
राज्यात अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटना वाढत आहे. अशात उस्मानाबाद जिल्ह्यातदेखील बलात्काराच्या घटना वाढल्या आहेत. यापूर्वी उमरगा, तुळजापूर या तालुक्यातदेखील अशाच घटना घडल्या होत्या. गावातीलच ओळखीचे आरोपी पाळत ठेऊन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करत असल्याचे यापूर्वीही समोर आले होते. त्यानंतर जिल्ह्यातील परंडा तालुक्यात अशीच घटना घडली आहे. नराधम आरोपी सोबत आणखी कोणी साथीदार होता का? याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत.