उस्मानाबाद - अक्षयच्या जाण्याचे दुःख आहे. मात्र, आरक्षण मिळाल्याचा आनंदही असल्याची प्रतिक्रीया अक्षयच्या आईने ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. यापुढे अशा आत्महत्या कोणी करु नये अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. जिल्ह्यातील देवळाली येथील अक्षय देवकरने दहावीच्या परीक्षेत ९४ टक्के गुण मिळवूनही, शाहू महाविद्यालयात प्रवेश मिळेल की नाही या चिंतेतून आत्महत्या केली होती.
सर्वांनी नोकरीसाठी आणि चांगल्या शिक्षणासाठी प्रयत्न करावेत. माझ्या मुलासोबत इतर लोकांनी दिलेले बलिदान विसरता येणार नाही, असे मत अक्षयच्या आईने व्यक्त केले. याबाबतीत असलेल्या जाचक अटीही शिथील करायला हव्यात, अशी मागणीही यावेळी अक्षयच्या आईने केली. अक्षय आज जिवंत असता तर त्याला शाहू महाविद्यालयात ११ वीत सहज प्रवेश मिळाला असता. माझ्या मुलाने थोडीसा अविचार केला. मात्र, जे झाले ते झाले याच्यापुढे कोणीही असा आत्महत्येचा विचार करू नये, असेही त्या म्हणाल्या.
अक्षय देवकरच्या आईची ईटीव्ही भारतला प्रतिक्रिया अक्षय हा आमच्या गावातील हुशार मुलगा होता. त्याच्या जाण्याने दुःख झाले आहे. जर लवकर आरक्षण मिळाले असते तर आज हा दिवस पाहायला मिळाला नसता. एसईबीसी मधील ज्या त्रुटी आहेत, त्या दूर व्हायला हव्यात, जेणेकरून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडचणी येणार नसल्याची प्रतिक्रिया अक्षयच्या गावकऱ्यांनी दिली.
देवकर कुटुंबातील अक्षय देवकर या दहावीच्या विद्यार्थ्यांने लातूर येथील शाहू कॉलेजमध्ये अकरावी वर्गासाठी प्रवेश मिळेल की नाही या चिंतेतून आत्महत्या केली होती. अक्षय देवकरला दहावीत 94.20 टक्के गुण मिळाले होते. सर्वच विषयात हुशार असलेल्या या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याने छत्रपती संभाजीराजे यांनी आरक्षण गेले खड्ड्यात अशी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी देवकर कुटुंबास भेट देऊन सांत्वन केले होते. लातूर येथील शाहू विद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव गव्हाणे यांनी यावर्षीचा संपूर्ण राज्यातील निकाल हा खाली आला असून, चार ते पाच टक्क्यांचा फरक यावर्षी पडणार आहे. यावेळी 91 टक्के असणाऱ्या विद्यार्थ्यांनाही प्रवेश मिळू शकतो असे डॉ. गव्हाणे यांनी सांगितले होते.