नाशिक - चेष्टा मस्करीत तरुणाच्या गुदद्वारात हवा भरल्याने 29 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. नाशिकच्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अशोका कृषी उद्योग कारखान्यात हा प्रकार घडला असून त्रंबकेश्वर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबादास तुटे असे मृताचे नाव आहे.
चेष्टा मस्करी भोवली.. गुदद्वारात हवा भरल्याने २९ वर्षीय तरुणांचा मृत्यू, त्र्यंबकेश्वरमधील धक्कादायक घटना - नाशिक गुन्हे वृत्त
नाशिकमधील अशोका कृषी उद्योग कारखान्यात काम करणाऱ्या कामगारांना मित्राची चेष्टा करणे चांगलेच अंगलट आले आहे. काजू स्वच्छ करण्याच्या एअर कॉम्प्रेसरने काही कामगारांनी एका युवकाच्या गुदद्वारामध्ये हवा भरल्याने त्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काही दिवसांपूर्वी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील तळेवाडी परिसरात असलेल्या अशोका कृषी उद्योग कारखान्यातील काही कामगार जेवणाच्या सुट्टीमध्ये चेष्टा मस्करी करत होते. त्यावेळी त्याठिकाणी असलेल्या काजू स्वच्छ करण्याच्या एअर कॉम्प्रेसरने काही कामगारांनी अंबादास तुटे या युवकाच्या गुदद्वारामध्ये हवा भरली. यावेळी त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने त्याला काहीजणांनी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र काही तासातच त्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. दरम्यान घटनेला नऊ दिवस उलटून देखील पोलीस तपास करत नसल्याचं सांगत आपल्याला देण्यात आलेला शवविच्छेदनाचा अहवाल देखील चुकीचा असल्याचा गंभीर आरोप अंबादास तुटे यांच्या भावाने केला आहे.
दरम्यान नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी याप्रकरणी संशयितांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे.
दरम्यान शेकडो हेक्टरमध्ये उभारण्यात आलेल्या त्रंबकेश्वर येथील अशोका कृषी उद्योग कारखान्यांमध्ये त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अनेक तरुण रोजंदारीवर काम करतात यातीलच एक असलेला अंबादास हा देखील याठिकाणी कामावर होता, मात्र चेष्टा मस्करीतून त्याच्या गुदद्वारात हवा भरण्यात आल्याचा प्रकार धक्कादायक असला, तरी अप्रशिक्षित कामगारांकडे एअर कॉम्प्रेसर गेलेच कसे, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.