औरंगाबाद - वाळूज परिसरात राहणाऱ्या एका तरुणाचेगुप्तांग कापून त्याची हत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. हत्येनंतर तरुणाचा मृतदेह एका विहिरीत आढळून आला होता. सुधाकर वारागंणे (वय ३०, रा. मौलखेडा, ता. सोयगाव, जि. औरंगाबाद) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी वाळूज ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची हत्या त्याच्याच सोबत राहणाऱ्या एका सहकाऱ्याने केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. संशयित आरोपी पंरप्रांतिय असून तो सध्या फरार आहे. संशयित आरोपी हा या ठिकाणी बनावट नावाने वास्तव्य करत असल्याची माहिती समोर आली आहे..
अशी पटली होती मृतदेहाची ओळख -
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या घनटेत ३ जुलैला वाळूज परिसरातील पडक्या विहिरीत एक मृतदेह आढळून आला होता. वाळूज पोलिसांनी व्हॉटसअॅप ग्रुपवर या घटनेतील मृतदेहाचे फोटो व्हायरल केला होते. मौलखेडा (ता. सोयगाव) येथील एका शिक्षकाकडे हे फोटो पाहिल्यानंतर त्यांनी हा सुधाकर वारागंणे असल्याचा संशय व्यक्त केला व त्याच्या भाऊ किशोर आनंदा वारागंणे याला माहिती दिली होती. त्यांने पोलिसांशी संपर्क साधला. सहायक पोलीस निरीक्षक विनायक शेळके यांनी नातेवाईकांना मृतदेह दाखविला. तेव्हा तो मृतदेह सुधाकर वारागंणे याचाच असल्याचे स्पष्ट झाले.
सर्व जण एकाच कंपनीत होते कामाला -
मृत सुधाकर हा दिनेश मुन्नालाल बंसकार (रा. सोहगपूर, जि. होशंगाबाद), विनीत गणेश बसौत (रा. रायपूर, जि. नरसिंगपूर) आणि बन्सीलाल ऊर्फ बंटी लाल चामार (रा. रायपूर, जि. नरसिंगपूर, मध्य प्रदेश) आणि आरोपी मोहंमद जुबेर जाकेर हुसेन या चौघांसोबत लिंबेजळगाव येथे खोली करून राहात होता. ते सर्वजण लिंबेजळगाव भागातील एका कंपनीत कामाला होते.