महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

येवल्यात वन्यजीव मांडूळ सापाच्या तस्करीचे रॅकेट उद्ध्वस्त; १९ जण ताब्यात - yeola forest department

येवला वन विभागाने मांडूळ सापाच्या तस्करीप्रकरणी १९ संशयित आरोपींना अटक केली आहे. दोन आरोपींना अटक केल्यानंतर त्यांच्याकडून इतर नावे समोर येत गेली. या सर्व आरोपींची वनविभागाच्या कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

yeola forest department arrested wildlife smuggling racket
येवला वनविभागकडून वन्यजीव तस्करीचे रॅकेट उध्वस्त

By

Published : Jun 16, 2020, 2:00 PM IST

येवला(नाशिक) - वन्यजीवांच्या तस्करीचे मोठे रॅकेट येवला वन विभागाचे अधिकारी व फिरत्या दक्षता पथकाने उद्ध्वस्त केले आहे. येवला परिक्षेत्र वन विभागाने गेल्या आठवड्यात तालुक्यातील सत्यगाव येथे मांडूळ जातीचे साप पकडले होते. याप्रकरणी दोघांना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीअंती वन विभागाच्या अधिकाऱ्यांना मोठे रॅकेट उद्ध्वस्त करण्यात यश आले आहे. याप्रकरणी १९ जणांना अटक करण्यात आली आहे. नाशिक, ठाणे, अहमदनगर येथून काही आरोपी तर पुणे जिल्ह्यातील एक पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांना अटक करून तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश वन विभागाने केला आहे. या टोळीकडून एक मांडूळ, मऊ पाठीचे कासव आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेल्या मोटार व दुचाकी जप्त करण्यात आले आहेत.

सत्यगाव येथे घरात मांडूळ साप लपवून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याआधारे छापा मारून वनविभागाने दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांच्या चौकशीतून वनविभागाच्या पथकाला महत्त्वाचे धागेदोरे हाती लागले. वनविभागाने सापळे रचून वडाळीभोई येथून प्रकाश बर्डे आणि संदीप बर्डे यांना अटक केली. या मांडुळाची विक्री देवळाली कॅम्प भागातील अंबादास बापू व धर्म देवराम जाधव यांना केली जाणार होती. या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांच्याकडून सिन्नर तालुक्यातील संतोष किसन काचोळे व किरण पांडुरंग सोनवणे यांची नावे उघड झाली. पथकाने त्यांनाही ४ जून रोजी अटक केली. न्यायालयाकडून त्यांची कोठडी घेतल्यानंतर पथकाकडून त्यांची कसून चौकशी करण्यात आली. त्यात ज्ञानेश्वर वाबळे (राहता ), निखिल गायकवाड (कोल्हापूर) यांना अटक केली. यापैकी निखिल गायकवाड याच्याकडे एक कासव आढळले.

अटकेतील आरोपींच्या तपासाच्या आधारावर इच्छामणी हॉटेल सिन्नर पुणे हायवे येथून मांडूळ विक्रीच्या तयारीत असणाऱ्या व्यक्तींना सापळा रचून अटक केली. यात संशयित सहाय्यक पोलीस निरीक्षक विश्वास चव्हाण (नेमणूक रबाळे पोलीस ठाणे ) व पुणे येथील चतुर्श्रुंगी पोलीस ठाण्याचे रायटर दीपक गोवर्धन धाबेकर यांच्यासह तस्करीच्या गुन्ह्यात सहभागी संशयित ज्ञानेश्वर वाबळे व निखिल गायकवाड (कोल्हार), निलेश रामदास चौधरी (चाकण), संदीप तानाजी साबळे (नारायणगाव ), महेश चंद्रबनी (अमरनाथ ) यांना अटक करण्यात आली.

जप्त केलेला मांडूळ साप आणि कासव

या तस्करीप्रकरणी एकूण १९ संशयित आरोपींना वन विभागाच्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. त्यांना न्यायालयाने वनविभागाची कोठडी दिली असून पुन्हा न्यायालयासमोर हजर केले जाईल. कासव व मांडुळ यांच्या तस्करीचे राज्यस्तरीय व आंतरराष्ट्रीय तस्करी संबंधित पुढील तपास सुरू आहे. मुख्य वनरक्षक के. एम. अंजनकर, उपवनसंरक्षक तुषार चव्हाण, उपविभागीय अधिकारी स्वप्नील गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा वनरक्षक सुजीत नेवसे, वनपरिक्षेत्र अधिकारी संजय भंडारी आणि फिरते पथक व कर्मचारी या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details