येवला (नाशिक) - येवल्यात विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची प्रशासन व आरोग्य विभागाच्या पथकाकडून कोरोना चाचणी करण्यात येत आहे. या चाचणीत कोरोनाबाधित आढळून आलेल्या व्यक्तीला कोविड सेंटरमध्ये भरती केले जाणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 15 दिवसांसाठी कडक निर्बंधांची घोषणा केली आहे. मात्र तरी देखील काही नागरिक अजूनही विनाकारण बाहेर फिरताना दिसून येतात. अशा नागरिकांवर चाप बसावा यासाठी विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार प्रमोद हिले, पोलीस निरीक्षक संदीप कोळी तसेच नगरपालिकेच्या मुख्याधिकारी संगीता नांदुरकर, पोलीस उपनिरीक्षक युवराज चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.शरद कातकडे या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये शहरातील विंचूर चौफुलीवर विनाकारण फिरणाऱ्यांची रॅपीड टेस्ट करण्यात येत आहे.