येवला ( नाशिक)- दिवाळीनिमित्त येवला तसेच अंदरसुल या बाजार समिती पुढील आठ दिवस बंद राहणार आहेत. ऐन सणासुदीच्या काळात बाजार समित्या बंद असल्याने शेतकऱ्यांची गैरसोय झाली आहे.
व्यापाऱ्यांनी दिलेल्या अर्जानुसार उत्पन्न बाजार समिती शुक्रवारपर्यंत बंद राहणार आहे. 14 नोव्हेंबर ते 16 नोव्हेंबरपर्यंत दीपावली व भाऊबीज हे सण आहेत. त्यामुळे बाजार समिती बंद राहणार आहे. तर बुधवार 18 नोव्हेंबरला व्यापाऱ्यांच्या अर्जानुसार कांदा, मका व भुसार लिलाव बंद राहणार आहेत.
येवला बाजार समितीत 18 नोव्हेंबपर्यंत लिलाव राहणार बंद बाजार समिती 19 नोव्हेंबरपासून होणार सुरू-
बाजार समितीत 19 नोव्हेंबरपासून लिलाव सुरळीत सुरू होणार आहेत. सलग आठ दिवस बाजार समिती बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. दिवाळी सणांला शेतकऱ्यांना पैशांची जास्त गरज असते. शेतकरी कांदे-मका व भाजीपाला यासह इतर शेतमाल विकून सण साजरे करतो. मात्र, तब्बल एक आठवडा लिलाव बंद असल्याने शेतमाल कुठे विकावा असा शेतकऱ्यांना प्रश्न पडला आहे.
व्यापाऱ्यांनी २६ ऑक्टोबरला केला होता कांद्याचा लिलाव बंद-
कांद्याचे बाजार भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य मंत्रालयाने अगोदर निर्यातबंदी, कांदा व्यापाऱ्यांवर प्राप्तिकर विभागाचे छापे, कांदा आयात करणे आणि आता कांदा साठवणुकीवर व्यापाऱ्यांना मर्यादा घातल्याने व्यापाऱ्यांसह कांदा उत्पादकांमध्ये कमालीची नाराजी निर्माण झाली आहे. यामुळे, येवला बाजार समितीमध्ये कांद्याचा लिलाव 26 ऑक्टोबरला बेमुदत बंद करण्यात आला होता.