नाशिक - जिल्ह्यातील 1 हजार 978 महसूल गावांपैकी 1 हजार 975 गावांचे सातबारा ऑनलाइन उपलब्ध आहेत. उर्वरित तीन गावांसंदर्भात असलेल्या तांत्रिक अडचणी शासनस्तरावर दूर करून लवकरच ती गावेही ऑनलाइन सातबारा प्रणालीमध्ये समाविष्ट करण्यात येतील. जिल्ह्यामध्ये सातबाराचे डिजिटायझेशन आणि संगणकीकरण ही बाब कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्यवर्ती सभागृहात झालेल्या महसूल बाबींच्या आढावा बैठकीत महसूल मंत्री थोरात बोलत होते. थोरात म्हणाले, प्रलंबित ई-फेरफार प्रकरणांबाबत नागरिकांना त्रास होऊ नये यासाठी प्रकरणे प्रलंबित राहाणार नाही म्हणून योग्य ती उपाययोजना राबवण्यात यावी. तसेच, सेवा हमी कायद्याद्वारे ई-हक्क प्रणालीवरील कामांचा यशस्वी पाठपुरावा देखील चांगली बाब असल्याचे थोरात यांनी सांगितले.
वाढत्या थंडीमुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढणार
वाढती थंडी आणि दिवाळीच्या कालावधीत बाजारपेठांमध्ये झालेली गर्दी लक्षात घेता कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. त्यामुळे, येत्या पाच सहा दिवसात रुग्णसंख्या वाढण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासनाने याबाबत योग्य ती काळजी घ्यावी. जिल्ह्यातील 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' सर्वेक्षण मोहिमेमध्ये जवळपास अडीच लाख को-मोर्बिड सापडले असून, त्यांची तपासणी करून त्यांच्यावर उपचार करण्यात यावे, जेणेकरून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश मिळेल, असेही थोरात यांनी सांगितले.