नाशिक- महिलांनी सर्वच क्षेत्रात बुलंद पताका फडकवतात यात कोणतीही शंका नाही. शासकीय कार्यालयापांसून उद्योग, व्यापार, बॅका या सर्वच क्षेत्रात महिलांचा सहजतेने वावर पहायला मिळतो. पण नाशिकमधील सुनीता पाटील या महिलेचे कार्यक्षेत्र कदाचित ग्लॅमसर अथवा प्रसिध्दी मिळवुन देणारे नक्कीच नसेल पण ते जे काम करतात. ते काम करणाऱ्या त्या एकमेव महिला ठराव्या. तुम्ही म्हणाल असे कोणते काम त्या करतात. अमरधाममध्ये अंत्यसंस्कारासाठी येणार्या पार्थिवांवर ते अंत्यसंस्कार करतात. अगदी प्रेत सरणावर ठेवणे, पाणी देणे कधीकधी तर अंतिम अग्नी देण्याचे कामही त्या करतात.
कोरोना काळात केले अंत्यसंस्कार - कोरोना काळात माणुसकीला काळीमा लावणार्या अनेक घटना समोर आल्या. रक्ताच्या नात्यांनीही अंतिम क्षणी पाठ फिरवली. प्रेतांवर अंतिम संस्कारासाठी नातेवाईक देखील धजावत नव्हते. अशा वेळी एक नाव चर्चेत राहिले, ते म्हणजे सुनीता राजेंद्र पाटील. कोरोनाकाळात अनेक मृतदेहांवर त्यांनी विधिवत अंतिम संस्कार केले. त्यांच्या अस्थी घेण्यासाठी नातेवाईक देखील पाठ फिरवायचे. पण सुनीता पाटील यांनी या अस्थींचे विधिवत गंगेत विसर्जित केले. त्यांच्या या कार्याची दखल माध्यमांना देखील घ्यावी लागली. कदाचित इतर यशस्वी महिलांसारखे त्यांच्या वाट्याला प्रसिध्दी, पैसा आला नाही. पण त्या पलीकडे जात 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' यावर विश्वास ठेवत कसलीही अपेक्षा न ठेवता त्यांनी त्यांचे कर्तव्य सुरु ठेवले आहे.