नाशिक- शनिवारी झालेल्या मुसळधार पावसावेळी निफाड तालुक्यात वीज पडून एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गेल्या चार दिवसांत वीज पडून जीवितहानी होण्याची तालुक्यातील ही दजुसरी घटना आहे. दरम्यान परतीच्या पावसाने तीन दिवसापासून लावलेल्या हजेरीमुळे गंघापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातून एक हजार क्यूसेस पाणी सोडण्यात आले आहे.
जिल्ह्यात शनिवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. गुरुवार पासुन परतीचा पाऊस सुरू आहे. त्यामुळे गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे. सध्या धरणातून एक हजार क्युसेस पाणी सोडण्यात आले आहे. तर निफाड येथे विजेच्या कडकडांसह मुसळधार पाऊस सुरू झाला. त्यावेळी शिरवाडे वणी येथे शेतात काम करत असलेल्या एका महिलेचा जागीच मृत्यू झाला. विभाबाई गुरव असे त्या मृत महिलेचे नाव आहे. चार दिवसांपूर्वी निफाड तालुक्यातील शिवडी येथे मंगला भाऊसाहेब क्षिरसागर या महिलेचाही वीज पडून मृत्यू झाला होता.
परतीच्या पावसामुळे गंगापूर धरणातून सोडले पाणी
परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान...
जिल्ह्यात गुरुवारपासून पावसाची दमदार सुरुवात झाली आहे. जिल्ह्यात या परतीच्या पावसाने, मका, सोयाबीन, कापूस, तुर, बाजरी, ज्वारी, कांदा, पपई, मिरची, सेायाबीन या पिकांना मोठा फटका बसला आहे. नाशिक जिल्ह्यात १३५ गावातील ४८ हजार ५९४ शेतकऱ्यांना त्याची झळ बसली आहे. तसेच या परतीच्या पावासाने झालेल्या नुकसानीचा सर्वाधिक फटका त्र्यंबकमधील शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान प्रशासनाने युध्द पातळीवर पंचनामे सुरू केले आहेत. त्यात पुन्हा पाऊस सुरू झाल्याने पंचनामे करण्यास अडचणी येत आहेत. यामुळे बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे. तर शनिवारी दुपारी झालेल्या पावसाने त्र्यंबकला परिसरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचले आहे. असाच पाऊस सुरु राहिला तर पिकांचे आणखी नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा - अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात अंदाजे 4 हजार कोटींचे नुकसान- अजित पवार
हेही वाचा - गुलबर्गा शहरात भूंकपाचे धक्के; तिव्रता 3.4 रिश्टर स्केल