महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ghost Determined Woman Welcomed In Nashik : भूताळीण ठरवलेल्या महिलेला साखर भरवून केली 'घरवापसी'; अंनिसच्या प्रबोधनाला यश - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रबोधन

इगतपुरी तालुक्यातील धारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भोरवाडी पाड्यावरील एका महिलेसह काही कुटुंबाला काही व्यक्तींनी भूताळीण ठरवून पाड्यावर घडलेल्या घटनांसाठी तिला जबाबदार ठरविले. या घटनेनंतर नाशिकच्या अंनिसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांसह पाड्यावर जात कुटुंबाला एकत्रित आणून त्याचे अंधश्रद्धा निर्मूलन करून समुपदेशन केले. अंनिसच्या कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार महिलांनी एकमेकींच्या तोंडात साखर भरून तोंड गोड केले.

Ghost Determined Woman Welcomed In Nashik
अंनिसच्या प्रबोधनाला यश

By

Published : Feb 7, 2023, 8:39 PM IST

अंनिसच्या प्रबोधनाला यश

नाशिक : यापुढे आम्ही प्रेमाने एकत्र राहू, कुणाला भूताळीण ठरवणार नाही किंवा अंधश्रद्धांच्या माध्यमातून दोष देणार नाही, असे मान्य केले. भुताटकी, मंत्रतंत्र, करणी, भानामती, जादूटोणा अशा अंधश्रद्धायुक्त अवैज्ञानिक गोष्टींवर आजही समाजात पारंपरिक समज दृढ आहेत. नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यातील धारगावच्या बोरवाडी पाड्यावर भूतबाधा केल्याचा आरोपाला आणि मानसिक त्रासाला कंटाळून आठ ते दहा कुटुंबांवर गाव सोडून जाण्याची वेळ आली होती.

काय होता घटनाक्रम: काही दिवसांपूर्वी या गावातील एका मुलाचा मृत्यू झाला होता. या मृत्यूला हे कुटुंब जबाबदार आहे असा आरोप मृत मुलाच्या आईकडून करण्यात येत होता. तसेच माझ्या मुलावर भूतबाधा केल्याचा आरोप त्या आईकडून सातत्याने करण्यात येत होता. यावरून अनेकदा वादविवादही झाले. सततच्या आरोपाला हे कुटुंब कंटाळले त्यांचा मानसिक छळ होऊ लागला. याप्रकरणी काही दिवसांपूर्वी पोलिसांनी या दोन्ही गटाला समज दिली होती. मात्र तरीही आठ-दहा कुटुंबावर आरोप होत असल्याने त्यांचे मानसिक खच्चीकरण झाले. अखेर त्या कुटुंबांना घर सोडून स्थलांतर करावे लागले.


अंधश्रद्धा अशाप्रकारे केली दूर :ही बाब महाराष्ट्र अंनिसच्या नाशिक येथील कार्यकर्त्यांना कळल्यानंतर त्यांनी तातडीने बोरवाडी पाड्यावर भेट देण्याचे ठरवले. त्याप्रमाणे अगोदर घोटी पोलीस ठाणे येथे जाऊन रीतसर विनंती पत्र पोलीस ठाण्याला देऊन संबंधित कुटुंबांना न्याय मिळावा, सर्वांनी एकत्र राहावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी केली. यावरून पोलीस अधिकारी दिलीप खेडेकर यांनी तातडीने कार्यकर्त्यांसमवेत त्यांचे एक सहकारी कर्मचारी दिले. त्यांच्यासह कार्यकर्ते भोरवाडी पाड्यावर पोहोचले. दोन्ही बाजूच्या महिला व पुरुषांना एकत्र आणून त्यांचे संपूर्ण म्हणणे ऐकून घेतले. केवळ भुताळीन ठरवून त्यातून गैरसमज झाल्याचे स्पष्ट झाले. भुताळीन ठरविलेल्या महिलेला मंत्र, तंत्र, जादूटोणा येत असेल आणि त्यातून जर वाईट घडत असेल असा जर कोणाचा समज असेल तर तो समज दूर करण्यासाठी, भूताळीण ठरवलेल्या महिलेने केलेला स्वयंपाक कार्यकर्त्यांनी सेवन केला. दोन्ही बाजूकडील व्यक्तींनाही सेवन करण्याचे आवाहन केले. इतरांनीही ते अन्न आणि पाणी घेतले.


अंधश्रद्धेबाबत माहिती दिली :त्यानंतर अंनिसच्या कार्यकर्त्यांनी अंधश्रद्धा आणि त्यांचे निर्मूलन याबद्दलचे शास्त्रीय विवेचन करून उपस्थितांच्या मनातील अंधश्रद्धांची जळमट दूर केली. शेवटी ज्या महिलेला भूताळीण ठरवले होते आणि ज्यांनी तिला भूताळीण ठरवले होते, अशा दोन्ही बाजूकडील महिलांना एकत्र आणले. कार्यकर्त्यांच्या विनंतीनुसार त्यांनी एकमेकींच्या तोंडात साखर भरून, तोंड गोड केले. यापुढे आम्ही प्रेमाने एकत्र राहू, कुणाला भूताळीण ठरवणार नाही किंवा अंधश्रद्धांच्या माध्यमातून दोष देणार नाही असे मान्य केले. या मोहिमेत महाराष्ट्र अंनिसचे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे, नाशिक शहर कार्याध्यक्ष कोमल वर्दे, सचिन महिरे, पोलीस हवालदार बी.आर. जगताप यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा :Mumbai Crime: हाय प्रोफाईल रिसॉर्टच्या नावाखाली बनावट वेबसाईट; आरोपीला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details