नाशिक - जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली असून एकट्या मालेगावात 37 कोरोना बाधित रुग्ण आहेत. यामुळे प्रशासनाने मालेगावमध्ये अधिक कडक नियम लागू केले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मालेगाव कोरोनाचा हॉटस्पॉट ठरतोय का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
नाशिकमध्ये मालेगाव ठरतोय का कोरोनाचा हॉटस्पॉट? 37 बाधित रुग्ण...
मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात 42 कोरोना बाधित रुग्ण असून यापैकी 37 रुग्ण एकट्या मालेगावातील आहेत. यामुळे प्रशासनाने मालेगावसाठीचे लॉकडाऊनचे नियम अधिक कडक केले आहेत.
संपूर्ण देशात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असताना नाशिक जिल्हा मात्र यापासून काही दिवस दूर होता. नाशिक जिल्ह्यात पहिला कोरोनाबाधित रुग्ण हा लासलगाव येथे मिळून आल्या नंतर प्रशासकीय यंत्रणा जोमाने कामाला लागली. यानंतर मालेगावमध्ये एकाच दिवशी तब्बल पाच कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आणि मग प्रशासन खडबडून जागे झाले.
मालेगाव शहरातील दाट वस्ती बघता ये थे कोरोना विषाणूचा प्रसार अधिक होऊ शकतो हे लक्षात घेता येथील संचारबंदीचे नियम अधिक कडक करून कोरोनाबाधित रुग्ण मिळून आलेल्या ठिकाणच्या नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.पालकमंत्री छगन भुजबळ,कृषी मंत्री दादा भुसे यांनी ह्या ठिकाणी मालेगावात येऊन आढावा घेऊन आरोग्य आणि पोलीस यंत्रणेला सूचना दिल्या.मात्र,असे असले तरी मालेगावात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढतच असून सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यात 42 कोरोना बाधित रुग्ण असून यापैकी 37 रुग्ण एकट्या मालेगावातील आहेत. प्रशासनाने मालेगावसाठीचे लॉकडाऊनचे नियम अधिक कडक केले आहेत. मालेगावात बाहेरून कोणी ही नागरिक येऊ शकत नाही आणि मालेगावातून बाहेर देखील जाऊ शकत नाही. अशा पध्दतीचा कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येऊन सर्व रस्ते सील करण्यात आले आहेत.
नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ.आरती सिंग यांनी दिनांक 14 एप्रिल च्या रात्री उशिरा पोलीस अधिकाऱ्यांसह मालेगावमधील हॉटस्पॉटची पाहणी केली. कुठल्याही परिस्थिती नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरणार नाही याची दखल पोलीस घेणार आहेत.अत्यावश्यक कामासाठी शहरातील फक्त 3 पेट्रोल पंप सुरू राहणार असून इतर पेट्रोल पंप बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 15 ते 19 एप्रिल पर्यंत मालेगाव मधील बँका बंद ठेवण्याचा स्वतंत्र आदेश काढणार असल्याचे प्रशासनने सांगितले आहे.
मालेगावकरांसाठी नेमके आदेश काय आहेत?
- मेडिकल ,हॉस्पिटल दिवसभर सुरु राहतील.
- दूध व चारा पुरवठा करणारे विक्रेते जाऊ शकतात.
- गॅस पुरवठा करणाऱ्या गॅस एजन्सी सुरू राहतील.
- अत्यावश्यक सेवेसाठी शहरातील फक्त तीन पेट्रोल पंप सुरू राहतील.
- भाजी विक्रेते आणि किराणा सकाळी 7 ते दुपारी 12 पर्यंत सुरू राहतील.
- अन्न दान करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थानां प्रशासनाची परवानगी आवश्यक.
- ड्रोन कॉमेऱ्याद्वारे पोलीस करणार पेट्रोलिंग.