नाशिक:शुभम बरकले व दर्शन आरोटे हे आगासखिंड येथील श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतनचे विद्यार्थी,शाळेत नेहमी पहिला क्रमांक मिळवणारा एकुलता एक शुभम आणि त्याचा मित्र दर्शन या दोन जिवलग मित्रांचा दुचाकीवरून जात असताना गॅस टँकरशी झालेल्या समोरासमोर धडकेत दुचाकी टँकर खाली दबल्याने दोघांचाही जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सिन्नर-घोटी महामार्गावरील शताब्दी इंग्लिश स्कूल समोर घडली.
दोन जीवलग मित्रांच्या अपघाती मृत्युने आगासखिंड गाव आणि स्वामी समर्थ विद्यानिकेतन मधील विद्यार्थी आणि शिक्षक शोकसागरात बुडाले. मिळालेल्या माहितीनुसार आगासखिंड कडून पांढुर्लीकडे स्कुटी वरून शुभम आणि दर्शन हे जीवलग मित्र जात असताना समोरून येणाऱ्या गॅस टँकरने त्यांना जोरदार धडक दिल्याने शुभमचा जागीच मृत्यू झाला तर दर्शनला उपचारासाठी एसएमबीटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा ही मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. दोन्ही विद्यार्थ्यांचे मृतदेह घेऊन रुग्णवाहिका गावात दाखल होताच संपूर्ण गावाला अश्रू अनावरण झाले होते,शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याबाबत सिन्नर पोलीस ठाण्यात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेही मित्र अतिशय हुशार होते. शुभम नेहमीच वर्गात पहिला यायचा, दहावीच्या परीक्षेतही शुभम कडून शाळेला मोठी आशा होती अशी भावना शाळेच्या शिक्षकांनी व्यक्त केली..
पप्पा माझा अभ्यास पूर्ण झाला आहे. आता पेपरला निघालो असे म्हणून शुभमने घरातील सर्वांचे आशीर्वाद घेतले. वडिलांना स्कुटी द्या म्हणून त्यांने हट्ट धरला. प्रारंभी त्यांनी त्याला नकार दिला मात्र कधीच हट्ट न करणाऱ्या शुभमला नाराज कसे करावे म्हणून त्यांनी गाडीची चावी देत त्यास जाण्यास परवानगी दिली. जिवलग मित्र दर्शनला घेऊन दोघेही स्कुटीने पांढुरलीकडे दहावीच्या पेपर साठी निघाले आणि त्यानंतर अवघ्या पंधरा मिनिटातच दोघांचा अपघाती मृत्यू झाल्याचा निरोप वडिलांच्या कानावर आलाा आणि त्यांच्या पायाखालची जमीन सरकली, आत्ताच डोळ्यासमोरून हसत खेळत पेपरला जातो असे सांगुन निघालेल्या शुभम आणि दर्शनचे अंत्यदर्शन घेण्याची दुर्दैवी वेळ आली असे शुभमचे वडील रामनाथ बरकले हे घटनास्थळी रडून सांगत होते.
हेही वाचा : Nagpur Crime News: होळीच्या रंगात भंग टाकण्याचा कट नागपूर पोलिसांनी उधळला; दोन कोटी रुपयांचे मेफेड्रोन ड्रग्स जप्त