नाशिक -जुलै महिन्याचा पंधरवडा उलटून देखील शहर परिसरात पावसाने समाधानकारक हजेरी लावली नसल्याने मनपा प्रशासनाने आठवड्यातून एक दिवस पाणी कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे उद्या (गुरूवारी) शहरातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार असल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.
प्रत्येक बुधवारी राहणार पाणी पुरवठा बंद
नाशिक जिल्ह्यामध्ये यंदा पावसाने दडी मारलेली असतानाच नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण समूह क्षेत्रांमध्ये पाणीसाठा 25 टक्क्यांच्या खाली गेल्याने आठवड्यातून एक दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय नाशिक महापालिका प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. दरम्यान पालिका प्रशासनाच्या या निर्णयानुसार आठवड्यातील प्रत्येक बुधवारी पाणीपुरवठा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र बुधवारी बकरी ईद असल्याने या आठवड्यातील पाणीकपात हे गुरुवारी करण्यात येणार आहे. तर पुढील आठवड्यापासून दर बुधवारी संपूर्ण दिवस शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
मनपा आयुक्ताचे आवाहन
प्रत्येक बुधवारी शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार असल्याने नागरिकांनी देखील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन नाशिक महानगर पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. यामुळे शहरावर ओढावलेले पाणीकपातीचे संकट गांभीर्याने घेत नाशिककरांनी देखील पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन, मनपा आयुक्त कैलास जाधव यांनी केले आहे.