दादा भुसे पाणी कपातीविषयी माहिती देताना नाशिक: शहराला गंगापूर धरणातून पाणी पुरवठा करणाऱ्यात येतो. सद्यस्थितीत गंगापूर धरणात 64 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नाशिक शहराला रोजची गरज 540 एमएलडी पाणी लागते. राज्यातील हवामान विभागाने एप्रिल आणि मे महिन्यात तापमानात वाढ होण्याचे संकेत दिले आहेत. अशात जून महिन्यात जर पाऊस आला नाही तर जुलैपर्यंतची परिस्थिती लक्षात घेता आठवड्यातून दोन दिवस पाणी पुरवठा बंद ठेवण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
पिण्याच्या पाण्याला प्राधान्य द्या :अल निनोमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य पाणी टंचाईच्या अनुषंगाने नियोजन करताना पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा विचार भुसे यांनी व्यक्त केला. यासाठी गावपातळीवर सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिल्या आहेत. पाणी टंचाईचे नियोजन करताना ग्रामपंचायत सदस्यांपासून तर खासदार या सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्यांच्या माध्यमातून नागरिकांना पाणी बचतीचे आवाहन करण्यात यावे. पाणी पुरवठा योजनांची कामे तातडीने पूर्ण करावीत. त्यासाठी प्रांताधिकारी यांनी संबंधित विभागांच्या स्थानिक पातळीवर बैठका घेऊन आवश्यकेनुसार नियोजन करण्यात यावे,अशा सूचना पालकमंत्री भुसे यांनी दिल्या आहेत.
रोजगार हमी योजनेतून कामे करावी:पिण्याच्या पाण्याला प्रथम प्राधान्य देण्यासोबतच वनक्षेत्रातील प्राण्यांना गरजेनुसार पाणी उपलब्ध होईल याकडेही लक्ष देण्यात यावेत. दुष्काळी परिस्थितीत गावपातळीवर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून लोकांच्या हाताला काम मिळेल यासाठी प्रयत्न करण्यात यावेत. गंभीर स्थिती टाळण्यासाठी अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन पाहणी करावी, नादुरूस्त बोरवेलची कामे मिशन मोडवर घेऊन तातडीने दुरूस्त करण्यात यावीत. पाण्याचा गैरवापर टाळण्यासाठी पालकमंत्र्यांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यास सांगितले.
कृषी विभागाने आराखडा तयार करावा:अन्नधान्याचे व पशुसंवर्धन विभागाने जनावरांना चारा उपलब्ध होण्यासाठी पुरवठा विभागाने नियोजन करावे. नाशिक जिल्ह्यातील उष्णतेची परिस्थिती लक्षात घेऊन शिक्षण विभागाने येणाऱ्या काळातील शाळांचा कालावधी आणि त्यांच्या वेळेचे नियोजन करणे आवश्यक आहे. तसेच संभाव्य टंचाई काळात कमी पाऊस झाल्यास किंवा उशिराने पाऊस आल्यास त्याकाळात कोणती पिके घेणे फायदेशीर ठरेल त्याअनुषंगाने कृषी विभागाने आराखडा तयार करावा. वाढत्या उष्णतेचा आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम लक्षात घेवून संभाव्य आजारांबाबत आरोग्य विभागाने सतर्कता बाळगून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करावे. संभाव्य निर्माण होणाऱ्या टंचाईकडे सकारात्मकपणे पाहून टिमवर्कने विकासात्मक कामे करण्यावर भर देण्यात यावा, असेही पालकमंत्री भुसे यांनी यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना सांगितले.
हेही वाचा:Rain Affect Farmers: खा. राणांनी दिली मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना नुकसानीची माहिती, पंचनामा करण्याच्या सुचना