नाशिक - जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असून जिल्हा बँक शेतकऱ्यांकडून सरसकट कर्ज वसूल करत आहे, जिल्हा बँकेकडून सहकारी पद्धतीने सुरू असलेली कर्ज वसुली थांबवावी, अन्यथा पालकमंत्र्यांच्या निवासस्थानावर धडक देऊन त्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा नाशिक जिल्हा विविध विकास सेवा सहकारी फाउंडेशनच्या सदस्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
...अन्यथा पालकमंत्र्यांना घेराव, सहकारी फेडरेशनचे उपजिल्हाधिकाऱ्यांना निवेदन - kapil bhaskar
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँक शेतकऱ्यांकडून सरसकट कर्ज वसूली करत आहे. ही कर्ज वसूली थांबवावी यासाठी, नाशिक जिल्हा विविध विकास सेवा सहकारी फाउंडेशनच्या सदस्यांनी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे.
मागील दोन वर्षापासून जिल्हा बँक अडचणीत आली असून त्यामुळे जिल्ह्यातील अकराशे विकास सोसायट्या आर्थिक अडचणीत सापडल्या आहेत. नोटबंदीमुळे या अडचणी अधिकच भर पडली आहे. त्यावर तोडगा म्हणून जिल्हा बँक शेतकऱ्यांना वसुलीसाठी नोटीस काढून त्यांच्या जमिनीचा लिलाव करत आहे. मात्र, दुसरीकडे शेती वगळता इतर उद्योग व संस्थांना दिलेल्या कर्जाची वसुली केली जात नाही, अशा मोठ्या थकबाकीदारांवर बँकेने कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी करण्यात आली आहे. दुष्काळामुळे शेतकरी संकटात आला असून बँकेने वसुलीची कारवाई त्वरित थांबवावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. तसेच अडचणीच्या परिस्थितीतून सावरण्यासाठी शिखर बँकेने जिल्हा बँकेला अडीच हजार कोटींचे कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशीही मागणी त्यांनी निवेदनाद्वारे केली. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांची सक्तीची वसुली न थांबवल्यास पालकमंत्र्यांना घेराव घातला जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. यावेळी फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डोखळे, राजू देसले विषुपंत गाय, उत्तम खांडबहाले आदी उपस्थित होते.