नाशिक - हवामानात अचानक बदल झाल्याने नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात व्हायरल तापाने आजारी पडलेल्या रुग्णांच्या संख्येत तब्बल 70 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
गेल्या आठ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने वातावरणात अचानक बदलले आहे. कधी ढगाळ वातावरण, तर मध्येच तापमान 37 ते 38 अंशांपर्यंत वाढत असल्याने उष्णता जाणवत आहे. तसेच रात्री आणि पहाटे हवेत गारवा असल्याने याचा थेट परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. यामुळे ताप, सर्दी, खोकला, अंगदुखी इ. साथीच्या आजारांच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
वातावरणातील बदलामुळे रुग्णालयात तरुणांची संख्या वाढत आहे, असे डॉक्टरांनी सांगितले. तसेच घाबरून न जाता योग्य वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे.