नाशिक : त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात आगामी सार्वजनिक सुट्ट्या आणि जवळ आलेल्या श्रावणानिमित्त गर्दी वाढण्याची शक्यता आहे. अशात व्हीआयपी दर्शनामुळे सर्वसामान्य भाविकांना मंदिरात दर्शनासाठी सहा ते सात तासांची प्रतीक्षा करावी लागते. हे बघता व्हीआयपींचे दर्शन काही दिवसांसाठी स्थगित करण्यात आले आहे.
राजशिष्टाचार पाहुण्यांना दर्शन :त्र्यंबकेश्वर मंदिर प्रशासनाने जरी व्हीआयपी दर्शन बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी त्र्यंबकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यांनी निर्णयासोबतच एक पत्र नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. यात जिल्हाधिकाऱ्यांनी, त्र्यंबकेश्वर तहसील व मुख्यधिकारी यांच्या आदेशाने येणाऱ्या राजशिष्टाचार पाहुण्यांना व्हीआयपी दर्शनाची सोय उपलब्ध करून देणार असल्याचे म्हटले आहे.
लाडू, बिस्कीट, पाण्याचे मोफत वाटप :दरवर्षी श्रावण मासाच्या निमित्ताने त्र्यंबकेश्वर येथे भाविकांची मोठी गर्दी होते. यात श्रावणी सोमवार निमित्त हजारो भाविक दर्शनाचा लाभ घेतात. यासाठी त्र्यंबक देवस्थान प्रशासनाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यापुढे दर्शन रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांना दर्शनानंतर राजगीऱ्याचे लाडू, बिस्कीटचे पुडे व पाण्याची बाटली मोफत दिली जाणार असल्याचे मंदिर प्रशासनाने सांगितले.
त्र्यंबकेश्वर मंदिर महत्त्व :त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे भारतातील एक प्राचीन तीर्थस्थान आहे. सर्व 12 ज्योतिर्लिंगापैकी हे विशेष आहे. हे मंदिर नाशिक शहरापासून 28 किमी अंतरावर सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यात स्थित आहे. पवित्र गंगा, गोदावर नदीचे उगमस्थान त्र्यंबकेश्वराच्या जवळ आहे. मंदिर प्रांगणाच्या जवळच कुशावर्त तीर्थ आहे. श्री ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे बंधू श्री निवृत्तीनाथ महाराजांची समाधी देखील त्र्यंबकेश्वरमध्येच आहे. त्र्यंबकेश्वरमध्ये अनेक धार्मिक संस्था देखील आहेत. ज्यामध्ये वेदशाळा, संस्कृत पाठशाळा, कीर्तन पाठशाळा, प्रवचन संस्था चालवितात.
ब्रह्मगिरी पर्वताचे महत्त्व :पौराणिक कथेनुसार असे सांगितले जाते की, ब्रह्मदेवांनी इथे एका पर्वतावर महादेवांना प्रसन्न करण्यासाठी तप केले. जे पुढील काळात ब्रह्मगिरी पर्वत नावाने विख्यात झाले. या पर्वतावर एकेकाळी गौतम ऋषींचे आश्रम होते. केलेल्या अपराधातून मुक्तता मिळावी म्हणून त्यांनी कठोर तपश्चर्या केली आणि महादेवांना प्रसन्न केले. गौतम ऋषींच्या तपश्चर्येवर प्रसन्न होऊन महादेवांनी त्रिमूर्ती ज्योतिर्लिंग स्वरूप धारण केले आणि तिथेच विराजमान झाले. तेव्हापासून हे स्थान त्र्यंबकेश्वर म्हणून ओळखले जाऊ लागले. त्र्यंबकेश्वर शिवलिंगाची वास्तविक रचना इतर 11 ज्योतिर्लिंगांपेक्षा वेगळी आहे. त्र्यंबकेश्वर येथे शिवपिंडीमध्ये अंगठ्याच्या आकाराच्या तीन कपार आहेत. ज्यात त्रिमूर्ती म्हणजेच ब्रह्मा-विष्णू-महेश विद्यमान आहेत, असे सांगितले जाते. या ज्योतिर्लिंगाची त्रिकाल पूजा केली जाते, जी स्थानिक माहितीप्रमाणे 350 वर्षांपासून सुरू आहे.
हेही वाचा:
- Raj Thackeray On Trimbakeshwar : 'कोणी मंदिरात आल्याने आपला धर्म बुडेल एवढा तो कमकुवत आहे का?'
- Nitesh Rane in Nashik : नितेश राणेंनी केली त्र्यंबकराजांची महाआरती, राजकारण पुन्हा तापणार ?
- Trimbakeshwar temple entry row: त्र्यंबकेश्वर मंदिरात घुसणाऱ्यांविरोधात कारवाई करा, अन्यथा राज्यातील मंदिरे दोन दिवस बंद -हिंदू महासभा