नाशिक -आधुनिक तंत्रज्ञान आणि खेळ या दोघांची सांगड घालत, नाशिकच्या आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विनायक वाडिले याने बुद्धिबळ शिकविणारे 'चेसविक' हे मराठी अॅप तयार केले आहे. या अॅपच्या माध्यमातून नवोदित खेळाडूंना बुद्धिबळ क्षेत्रातील ग्रँड मास्टर आणि आंतरराष्ट्रीय खेळाडू धडे देत असून या अॅपला बुद्धिबळ प्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी चीन अॅपवर बंदी आणत,देशातील युवकांनी वेगवेगळ्या विषया संबंधित मार्गदर्शन करणारे अॅप तयार करावे, असे आवाहन 'मन की बात' या कार्यक्रमात केले होते. तसेच देशवासियांना स्वदेशी खेळाकडे अधिक लक्ष देण्याचे सांगितले होते. मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद देत नाशिकचा आंतरराष्ट्रीय बुद्धिबळपटू विनायक वाडिले याने बुद्धिबळ खेळाविषयी मराठीतून मार्गदर्शन करणारे मोबाइल अॅप तयार केले आहे. आधुनिक तंत्रज्ञान आणि खेळ या दोघांची योग्य सांगड घालून विनायक वाडिले याने बुद्धिबळाविषयी 'चेसविकी' नावाचे एक अॅप तयार केले आहे. हे अॅप अँड्रॉइड या प्लॅटफार्मवर उपलब्ध असून यासाठी 3 एमबी एव्हढी नाममात्र जागा लागते.
विनायक अधिक माहिती देताना... बहुतेकांना बुद्धिबळ अवघड खेळ वाटतो. मात्र हे अॅप हा समज खोटा ठरवत असून बुद्धिबळ खेळ किती सोपे आहे, हे सांगतो. या अॅपमध्ये बुध्दिबळातील हजारो कोडी आहेत. या ठिकाणी बुद्धिबळाविषयी प्रश्नमंजुषा देखील आहे. ज्यात जिंकल्यास आकर्षक बक्षिसे देखील मिळणार आहेत. या अॅपचे महत्त्वाचे वैशिष्ट म्हणजे, तुम्ही येथे आपले बुद्धिबळ विषयक प्रश्न बुद्धिबळातील विविध ग्रँडमास्टर आणि आंतरराष्ट्रीय मास्टर यांना मराठी भाषेमधून विचारू शकता.
चेसविकी अॅपचा निर्माता विनायक वाडिले याने याआधी आशिया खंडातील बुद्धिबळविषयक पहिले संकेतस्थळ देखील तयार केले होते. त्याला देखील उदंड प्रतिसाद मिळाला आहे. विनायकच्या कार्याचा गौरव म्हणून त्याला मागील वर्षी नाशिक मिरची युथ आयकॉन, राष्ट्रीय यंग बिर्ला इंडियन अवार्डने सन्मानित करण्यात आले होते. नुकताच राज्यस्तरीय क्रीडारत्न पुरस्काराने देखील विनायकचा सन्मान करण्यात आला आहे.
नाशिकचा युवा गँडमास्टर विदीत गुजराथी यांच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये पहिल्यांदाच रशियाबरोबर संयुक्तपणे सुवर्ण पदक जिंकले. यामुळे नाशिकचे नाव सातासमुद्रापार पोहोचले आहे. अशात विनायकने अॅप तयार नाशिकच्या नावलौकिकात भर टाकली आहे. एकूणच ज्या खेळाडूंना बुद्धिबळ खेळात उंच भरारी घ्यावयाची आहे, त्यांच्यासाठी चेसविकी हा अॅपची मोठी मदत होणार आहे. दरम्यान, विनायकच्या अॅपला बुद्धिबळप्रेमींचा मोठा प्रतिसाद मिळत आहे.