नाशिक -स्वीडनची रहिवासी आणि नोबेल पुरस्कार विजेती पर्यावरणवादी कार्यकर्ती ग्रेटा थनबर्गला नाशिकला होत असलेल्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनात उद्घाटक म्हणून बोलवण्याचा निर्धार करण्यात आला. विद्रोही मराठी साहित्य समितीच्या नाशिकमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
साहित्यिकांच्या विचारांना घेऊन आमने-सामने उभे ठाकण्याचा निर्धार -
आयोजित केलेल्या बैठकीमध्ये नाशिकमध्ये होणाऱ्या विद्रोही साहित्य संमेलनाच्या समित्यांबाबत चर्चा करण्यात आली. अखिल भारतीय मराठी संमेलनाच्या कालावधी दरम्यानच विद्रोही संमेलन घेऊन प्रस्थापितांसमोर वैचारिक आणि सांस्कृतिक लढा देण्याचे ठरवण्यात आले आहे. संविधानाच्या सन्मानार्थ लोकशाहीर वामनदादा कर्डक, दादासाहेब गायकवाड,बाबूराव बागूल, अरुण काळे आदी साहित्यिकांच्या विचारांना घेऊन आमने-सामने उभे ठाकण्याचा निर्धारही यावेळी केला.
ग्रेटावर दिल्ली पोलिसांनी केला गुन्हा दाखल -
नाशिकच्या हुतात्मा स्मारकात संविधान सन्मानार्थ सोळाव्या विद्रोही मराठी साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी झालेल्या बैठकीत उद्घाटकाबाबत चर्चा करण्यात आली. ग्रेटा थनबर्गला नाशिकमध्ये बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रेटा थनबर्गने दिल्लीमध्ये सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला सोशल मीडियाद्वारे पाठिंबा दिला आहे. मात्र, भावना भडकवण्याचे कारण देत ग्रेटा थनबर्ग विरोधात दिल्ली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.