नाशिक - सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात रोज नवी माहिती समोर येत आहे. सुशांत पूजा करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओचे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर कनेक्शन समोर आले आहे. मात्र, त्र्यंबकेश्वरमधील पुरोहितांपैकी कोणत्याच पुरोहितांनी ही पूजा केली नसल्याचा खुलासा त्र्यंबकेश्वरच्या पुरोहित संघाने केला आहे.
प्रशांत गायधनी - अध्यक्ष, त्र्यंबकेश्वर पुरोहित संघ सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे नाशिकमधील त्र्यंबकेश्वर कनेक्शन समोर आले आहे. सुशांतचे जुने व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. सध्या सोशल मीडियावर सुशांतचा पूजा करतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे. सुशांतच्या घरच्या पूजेचा हा व्हिडिओ आहे. मात्र, या पुजेला रिया चक्रवर्ती उपस्थित नव्हती.
सुशांतसिंह राजपूतच्या वांद्रे येथील केपरी हाइट्स इमारतीतील १५ व्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये रुद्राभिषेकाची पूजा करण्यात आली होती. ही पूजा करणारे पुरोहित पंडित नारायण शास्त्री हे नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील असल्याची माहिती समोर येत आहे. या पुजेला कोण कोण उपस्थित होते? या पुजेच्यावेळी सुशांतची मानसिक स्थिती काय होती? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. मात्र, ही पूजा करणारे पुरोहित त्र्यंबकेश्वरमधील नसल्याचा खुलासा त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाने केला आहे.
दरम्यान, सुशांतसिंह राजपूत यांच्या घरी जाऊन पूजा करणारे पंडित नारायण शास्त्री हे पुजारी त्र्यंबकेश्वरमधून रविवारी रात्रीपासून गायब आहेत. तर पुरोहित संघाने कालसर्पसारख्या पूजा या त्र्यंबकेश्वरमध्ये येऊनच कराव्या लागतात. त्यामुळे अशाप्रकारे फसवणूक करणाऱ्या पूजा केल्याप्रकरणी संबंधित पंडित नारायण शास्त्रीविरोधात पोलिसात तक्रार देणार असल्याचे पुरोहित संघाने सांगितले आहे.