नाशिक : शहरातील जुने सिडको परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी दिवसाढवळ्या गुंडांनी एका भाजी विक्रेत्याची हत्या केल्याची घटना घडली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. या घटनेला काही तास उलटत नाही तोच त्याच परिसरात शुक्रवारी रात्री उशिरा काही टवाळखोरांनी हैदोस घालत अनेक वाहनांची तोडफोड केल्याची घटना घडली आहे. या परिसरात सातत्याने घडणाऱ्या घटनांमुळे पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
१२ ते १५ गाड्यांची तोडफोड :याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकच्या जुने सिडकोतील छत्रपती शिवाजी महाराज चौक साईबाबा मंदिर मागील बाजू येथे अज्ञात टवाळखोरांनी 12 ते 15 वाहनांची तोडफोड करून परिसरात दहशत माजविण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. या घटनेची पोलिसांनी गंभीर दखल घेतली असून तातडीने परिसरात मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तसेच पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून टोळक्यानी हे कृत्य केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलीस करत आहेत.
पोलिसांचा धाक उरला नाही :सिडको परिसरात गेल्या काही महिन्यांपासून खून, हाणामाऱ्या, चोऱ्या अशा गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे. अशात पोलिसांचा धाकच उरलेला नसल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांमधून उमटू लागल्या आहेत. पोलिसांनी या भागात ग्रस्त वाढवावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.