नाशिक- जिल्ह्यात मागील १५ दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. या पावसामुळे फळे भाजीपाला पीक वाया गेले आहे. त्यामुळे बाजारात होणारी आवकही मोठ्या प्रमाणत घटली आहे. परिणामी भाजीपाल्याचे भाव कडाडले असून ऐन सणासुणीदीच्या दिवसात ग्राहकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन आणि त्यानंतर अतिवृष्टीने संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सध्या उपलब्ध मालास चांगला भाव मिळत आहे. मात्र, सर्वसामान्य जनतेच्या खिशाला फटका बसू लागला आहे.
किरकोळ बाजारात प्रत्येक भाज्यांचे भाव 25 ते 30 टक्क्यांनी वाढले आहेत. यामध्ये फ्लॉवर, कोबी, भेंडी, गवार, शिमला मिरची, मेथी आदींच्या भावात मोठ्या प्रमाणात भाववाढ झाली आहे. एकीकडे कांदा 90 रुपये किलोवर जाऊन पोहोचला असून डाळींच्या भावाने देखील शंभरी पार केली आहे. याचा परिणाम सर्वसामान्य नागरिकांच्या महिन्यांच्या खर्चावर झाला आहे. ऐन सणासुदीच्या काळात एकीकडे कोरोनामुळे नागरीकांची आर्थिक गणित बिघडले असून दुसरीकडे महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे.
पावसामुळे भाजीपाल्याचे नुकसान
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक भाजीपाल्याचे उत्पादन सिन्नर, त्र्यंबकेश्वर, निफाड, दिंडोरी इगतपुरी या भागात घेतले जाते. मात्र याच भागात अवकाळी पावसाने भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले असून परिणामी बाजारत भाजीपाल्याची आवक घटली आहे. त्यामुळे प्रत्येक भाजीपल्याच्या दरात 25 ते 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.