नाशिक - नाशिक जिल्ह्यातील कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता आता जिल्हा प्रशासनाने लसीकरण (vaccination) मोहिमेला अधिक गती दिली आहे. जिल्ह्यातील 72 लाख लोकसंख्येपैकी 17 लाख नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले असून अजूनही लसीकरण न करून घेतलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्ह्यातील 72 लाख लोकसंख्येपैकी 17 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण झाले आहे. जिल्ह्यात 45 ते 60 वयोगटातील नागरिकांचे सर्वाधिक लसीकरण झाले आहे.
13 लाख 2 हजार 397 नागरिकांचा पहिला डोस पूर्ण
कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता नागरिकांनी लसीकरण करून घेण्याचे आवाहन शासनाकडून काढण्यात आले आहे. यात नाशिक जिल्हा प्रशासनाकडूनही लसीकरण मोहिमेला गती देण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यात नागरिकांचा लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आतापर्यंत जिल्ह्यामध्ये तब्बल 17 लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात 13 लाख 2 हजार 397 नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला असून 3 लाख 98 हजार एकशे एक नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी दिली आहे
गरोदर महिलांच्या लसीकरणासाठी विशेष कक्ष
सध्या पूर्ण लसीचा तुटवडा निर्माण होत असला तरी कोविशील्ड (covishield vaccine) आणि कोवॅक्सिन (covaxin) या दोन्ही लसी टप्प्याटप्प्याने उपलब्ध झाल्यानंतर लवकरच लसीकरण मोहीम सुरळीत केली जाईल, असा देखील जिल्हा आरोग्य प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे. दरम्यान, लसीकरण करून घेण्यास अद्यापही पुढे न आलेल्या नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक अशोक थोरात यांनी नाशिककरांना केले आहे. गरोदर महिलांनी बाळाच्या सुरक्षितेसाठी लवकरात लवकर लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. गरोदर महिलांच्या लसीकरणासाठी जिल्हा रुग्णालयात विशेष कक्ष स्थापन करण्यात आला आहे.