नाशिक : कृषी केंद्रांमध्ये युरिया उपलब्ध नसल्याच्या तक्रारी काही शेतकरी करत असतात. तर काही दिवसांपूर्वी निफाड तालुक्यात काळ्या बाजारात लाखो रुपयांचा युरिया घेऊन जाणाऱ्या माफियांवर गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली होती. या प्रकरणात पोलिसांनी 20 लाख रुपयांच्या 500 युरियाच्या गोण्यांसह काही माफियांना ताब्यात घेतले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात युरियाचा होणारा काळाबाजार लक्षात घेता पोलिसांनी युरिया माफियांचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन असल्याचा संशय व्यक्त केला आहे.
दोन दुकान मालकांवर गुन्हा दाखल : निफाड पोलिसांनी युरिया माफियांवर केलेल्या कारवाईनंतर आता धक्कादायक माहिती समोर येत आहे. या फरारी आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर अनेक गोष्टी उजेडात येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. आदिनाथ कृषी सेवा केंद्र आणि शेलार ऍग्रो या दोन दुकान मालकांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यावेळी त्यांना युरियाच्या साडेपाचशे गोणी सापडल्या होत्या.
काळ्याबाजारात जाणारा ट्रक पकडला : नाशिक ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून निफाडला रात्री 25 जुलै रोजी 1 वाजेच्या सुमारास काळ्याबाजारात विक्रीसाठी जाणारा युरिया घोटाळा समोर आला होता. लासलगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतील भरवस फाटा नांदगाव रोडवर एका वस्तीवर केंद्र शासन अनुदानित प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना शिक्का असलेल्या एका गोणीतून दुसऱ्या खासगी गोणीत भरत होते. तसेच mh 18 Bh 1786 या ट्रकमधून काळ्या बाजारात 20 लाख रुपयांच्या 500 युरियाच्या गोण्या भरून ही गाडी मुंबईत एका कंपनीत जात होती. यावेळी निफाडला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ट्रक पकडला. यात एका संशयितासह ड्रायव्हर क्लिनर यांना पोलिसांच्या ताब्यात घेतले होते.
शेतकऱ्यांचा युरिया काळ्या बाजारात :शेतकऱ्यांना मुबलक युरिया मिळावा म्हणून केंद्र सरकारने प्रधानमंत्री भारतीय जन उर्वरक परियोजना चालू केली. या अंतर्गत शेतकऱ्यांना युरियाची गोणी 280 रुपयांना मिळते. शेतकऱ्यांना युरिया मुबलक मिळत नाही व घ्यायचा असल्यास आधारकार्ड लिंक करून युरिया घ्यावा लागतो. तर कृषी परवानाधारक दुकानदार युरिया माफियाला गोणी 2 हजार रुपयाला विकतात. हाच युरिया माफिया एक गोणी मुंबईत कंपनीला 5 हजार रुपयाला विक्री करतो अशी माहिती सूत्रांनी दिली.
हेही वाचा -
- Urea Black Market : युरियाचा काळाबाजार; कृषी साहित्य विक्री संचालकास शिवसैनिकांची मारहाण
- अमरावतीत कृषी संचालकांकडून युरियाचा काळाबाजार, शेतकऱ्यांचा आरोप
- Milk Adulteration : पांढर्या दुधाचा काळाबाजार; गुन्हे शाखेच्या कारवाईत 1040 लिटर भेसळयुक्त दूध जप्त