नाशिक जिल्ह्यात गारांचा अवकाळी पाऊस नाशिक:रविवारी संध्याकाळी विजेच्या गडगडासह जिल्ह्यात गारांचा अवकाळी पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले, 15 दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाच्या संकटातून शेतकरी सावरत नाही तोच, पुन्हा एकदा जोरदार झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
रब्बी पिकांचे मोठे नुकसान: नाशिक जिल्ह्यात नांदगाव, सिन्नर,नांदूर,गावात रात्री जोरदार मेगगर्जनेसह अवकाळी पाऊस झाला. या बेमोसमी पावसाने रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाले.सिन्नरमध्ये विजेच्या कडकडाटासह जोरदार गारांचा पाऊस झाला,मोठ्या प्रमाणात गारां पडल्याने शेतात 2 इंचा पर्यंत गारांचा खच जमा झाला होता. शेतातील कांदा, मिरची पिकांचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
इगतपुरीत जोरदार गारांचा पाऊस: तसेच इगतपुरी तालुक्यातील पूर्व भागात बेळगाव तऱ्हाळे, धामणी पिंपळगाव, मोर धामणगाव, साकूर टाकेद परिसरात जोरदार वादळी वारा विजेच्या कडकडत गारांचा जोरदार पाऊस झाला. यामुळे या भागातील भाजीपाला, गहू, मका, जनावरांचा चारा, वीटभट्टीचे मोठ्याप्रमाणत नुकसान झाले आहे.
नांदगांवात अवकाळी पाऊस:नांदगावला देखील गारांसह अवकाळीचा फटका बसला आहे. या भागातील लक्ष्मीनगरला, आझादनगरला अवकाळी पाऊस बरसला. विजेच्या कडकटासह गारांच्या पावसामुळे नागरीक भयभीत झाले होते, आर्धा तास झालेल्या या गारांच्या पावसामुळे कांदा पिकासह मिरची, टोमॅटो, कलिंगड पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच या भागातील वीज पुरवठा देखील खंडित झाला होता.
पिके भुई सपाट: नांदूर शिंगोटे झालेल्या जोरदार अवकाळी पावसामुळे दापूर, भोजापुर परिसरात द्राक्ष बागांची काढणी तसेच काढण्यासाठी आलेला उन्हाळी कांदा पिकाचे मोठे नुकसान झाल आहे. एकीकडे शेतमालाला भाव नाही तर, दुसरीकडे आसमानी संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. गतवर्षी खरीप व रब्बी हंगामानंतर अवकाळी पावसाने तालुक्यातील अनेक भागात शेतकऱ्यांचा अतोनात नुकसान झाल्यानंतर अद्यापही बळीराजाला नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यातच अवकाळी पावसाने पुन्हा हजेरी लावल्याने बळीराजा मेटाकुटीस आला आहे.
15 दिवसांपूर्वी झालेले नुकसान: नाशिक जिल्ह्यात मागील पंधरा दिवसांपूर्वी जोरदार अवकाळी पाऊस झाला. यात जिल्ह्यात कांदा 3556.86 हेक्टर, गहू 1595.72हेक्टर, भाजीपाला 436.20 हेक्टर, द्राक्षे 782.67 हेक्टर, आंबा 1034.30 हेक्टर, डाळिंब 35 हेक्टर, कांदा रोपे 510 हेक्टर, टोमॅटो 14 हेक्टर, हरभरा 75 हेक्टरचे नुकसान झाले आहे.
हेही वाचा: Rain Affect Farmers अवकाळी पावसाने आठ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान जाचक अटीमुळे शेतकरी मदतीपासून वंचित