नाशिक : सिन्नर तालुक्यातील पास्ते तेथील वसंत आव्हाड हे शेतात गेले होते. यावेळी विहिरीत डोकावत असताना, कपारीला दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. तोच वसंत आव्हाड यांनी हातातील छत्री उघडून बचाव करण्याच्या प्रयत्न केला. छत्री उघडताच बिबट्या घाबरला आणि उडी चुकल्याने तो 50 फूट खोल विहिरीत पडला. आव्हाड यांनी शेजारील शेतकऱ्यांना आवाज दिला तेव्हा परिसरातील शेतकऱ्यांनी धाव घेत आव्हाड यांना धीर दिला.
वनविभागाच्या मदतीने बिबट्याला बाहेर काढले :बिबट्या विहिरीत पडल्याची माहिती पसरतात नागरिकांनी बिबट्याला बघण्यासाठी मोठी गर्दी केली. याबाबतची माहिती वनविभागाला कळवण्यात आली. त्या अगोदर स्थानिक नागरिक सुनील आव्हाड, संजय आव्हाड, शरद आव्हाड या शेतकऱ्याने दोरखंडाला खाट बांधत विहिरीत सोडली. स्वतःचा बचाव करण्यासाठी बिबट्या या खाटेवर स्वार झाला आणि वनविभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाल्यानंतर विहिरीत पिंजरा सोडत बिबट्याला बाहेर काढण्यात आले. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी महोदरी येथील वनोउद्यानात आणून पोटाला जखम झालेल्या बिबट्यावर उपचार केले. वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल सुजित बोडके, वनरक्षक गोविंद पंढरे, संजय गीते यांनी रेस्क्यू ऑपरेशन यशस्वी केले.
बिबट्याच्या डरकाळीने परिसरात घबराट :शेतकऱ्यावर हल्ला करण्याच्या नादात विहिरीत पडलेल्या बिबट्याने जीवाच्या आकांताने डरकाळ्या सुरू केल्या. पाणी जास्त असल्यामुळे बिबट्याने पाईप व मोटर तरंगण्यासाठी वापरलेल्या वायररोपचा आधार घेतला होता. दरम्यान स्थानिक शेतकऱ्यांनी त्यास वाचवण्यासाठी विहिरीत खाट सोडली. यावेळी स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बिबट्या लगेच खाटेवर बसला. पोटाला मार लागल्याने बिबट्या आक्रमक झाला होता.