मनमाड (नाशिक) - जिल्ह्यातील मनमाडजवळ असलेल्या इंडेन गॅस बॉटलिंग प्लांटमधील एक, तर इंडियन ऑइल कंपनीचा (आयओसी)एक अशा दोन अधिकाऱ्यांचा अकस्मात मृत्यू झाला आहे. यापैकी आयओसीचे अधिकारी हे १४ दिवसांसाठी क्वारंटाइन होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांचा मनमाड येथील अधिकारी निवासात मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.
आयओसीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्याचे नाव जालिंदर कालेकर होते. ते पानेवाडी प्रकल्पात टर्मिनल मॅनेजरपदावर कार्यरत होते. ते आपल्या कुटुंबीयांना भेटून नुकतेच पुण्यावरून परतले होते. त्यामुळे त्यांना १४ दिवसांसाठी कंपनीच्या अधिकारी निवासात क्वारंटाइन करण्यात आले होते. मात्र, दुसऱ्याच दिवशी ते त्यांच्या खोलीमध्ये बेशुद्ध पडल्याचे सुरक्षा रक्षकाला दिसले. त्याने लगेच पानेवाडी येथील अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर कालेकर यांना उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तिथे त्यांना मृत घोषित केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कालेकर यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? याचा पोलीस तपास करत आहेत.